27-4-2022 ते 3-5-2022
साडेसातीचा बागुलबुवा
मोगलांच्या घोडय़ांना संताजी धनाजीची जेवढी भीती वाटली नसेल, युपेनच्या सर्वेसर्वाला पुतीनची जेवढी भीती वाटली नसेल, चोराला चांदण्याची वाटली नसेल, उंदराला मांजराची वाटली नसेल तेवढी किंबहुना त्याहून जास्त भीती आपल्याला शनिमहाराजांची वाटते. 29 एप्रिलला शनिमहाराज स्वतःच्या मकर राशीमधून त्यांच्या आवडत्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. धनुवाले आता मोकळा श्वास घेतील. मकरवाल्यांची शेवटची अडीच वर्षे सुरू होतील आणि मीनवाल्यांच्या पोटात गोळा आला असेल. कारण त्यांची साडेसाती सुरू होत आहे. या लेखाचा एकमात्र उद्देश म्हणजे समाजमनात साडेसाती आणि शनी याविषयी जी भीती बसली आहे ती काढणे आणि पोटभरू आणि गल्लाभरू ज्योतिषांच्या भ्रामक भीतीला दूर सारून पुढे कसे जायचे हे सांगणे आहे. बरं नुसती साडेसाती असते का? नाही. त्यात आणि अडीचकी किंवा ढैया किंवा पनौती हाही प्रकार असतो. म्हणजे तुमच्या जन्म राशीच्या आदल्या राशीमध्ये जेव्हा शनिमहाराज गोचरीने प्रवेश करतात त्यावेळी तुमची साडेसाती सुरू होते आणि तुमच्या जन्म राशीच्या पुढच्या राशीला ओलांडून जेव्हा पुढे जातात तेव्हा तुमची साडेसाती संपते. ही झाली साडेसातीची व्याख्या. ढैय्या किंवा अडीचकी म्हणजे तुमच्या जन्मराशीच्या चौथ्या राशीमध्ये किंवा आठव्या राशीमध्ये जेव्हा शनिमहाराजांचा आगमन होते तेव्हा तुमची अडीचकी किंवा छोटी पनवती सुरू होते. माणसाचे आयुष्य 70 वर्षे धरले आणि दोन साडेसाती माणूस भोगणार असे जरी पकडले तरी पंधरा वर्षे अधिक दोनदा अडीचकी म्हणजे पाच वर्ष म्हणजे जवळजवळ वीस वर्ष सामान्य माणूस या तथाकथित साडेसातीच्या काळय़ा छायेमध्ये किंवा भोवऱयामध्ये अडकलेला असतो. (असे पोटभरू ज्योतिषी सांगतात) त्यात तुमची शनिमहाराजांची महादशा आली तर ती 19 वर्ष म्हणजे वीस अधिक 19 बरोबर जवळजवळ 39 ते 40 वर्ष आपण हे भोगतो. तुम्हाला हे पटते का? चाळीस वर्षे एखादा माणूस कायम दुःखच भोगत आला असे होते का? बरं साडेसातीमध्ये नुकसानच होते का? उत्कर्ष होत नाही का? साडेसातीमध्ये अत्यंत उत्कर्ष झालेल्या झालेली कित्येक उदाहरणे आपल्या समोर आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष साडेसातीमध्ये झाला. मोरारजी देसाई, इंदिरा गांधी साडेसातीमध्ये पंतप्रधान झाल्या. बेझोसने अमेझॉनची स्थापना साडेसातीमध्ये केली. नरेंद्र मोदी साडेसातीमध्येच तिसऱयांदा मुख्यमंत्री झाले. प्रियांका चोप्रा विश्वसुंदरी साडेसातीमध्ये झाली. महेंद्रसिंग धोनीने साडेसातीमध्येच कप्तानी करत विश्वचषक जिंकला. मग साडेसाती वाईट कशी? तुम्ही पाहिले असेल की कित्येक लोक साडेसाती चालू असतानाही मजेत जगतात. काही त्रास होत नाही. याउलट काही लोकांना भयंकर त्रास होतो. काहीही वाईट झाले तर त्याचे खापर शनिदेवावर फोडायची आपल्या समाजाची मानसिकता झालेली आहे, जी संपूर्ण चुकीची आहे. डोळय़ावरची पट्टी काढून स्वच्छ मनाने ज्योतिषशास्त्राकडे बघायचे दिवस आता आलेले आहेत. शनि महाराजांसारखा गुरु कोणी नाही. त्यांच्यासारखाच दाता कोणी नाही. त्यांच्यासारखा न्यायाधीश कोणी नाही. साडेसाती किंवा पनौती सुरू झाली की ही शांति करा असले प्रकार काही तथाकथित ज्योतिषी सुचवतात. त्यांची खरोखर कीव करावीशी वाटते. म्हणजे न्यायाधीशांनाच लाच देण्याचा प्रकार तुम्ही करणार? हे हास्यास्पद नाही का? (क्रमशः)
महा उपायः नवीन वाहनाची पूजा करून झाल्यानंतर वाहनामध्ये वाहन दुर्घटना नाशक यंत्र आणि 3 कवडय़ा ठेवाव्यात. वाहन जवारी अंडय़ावरून उत्तरेकडे न्यावे.
सोपी वास्तू टीप ः कोणत्याही खोलीला गडद लाल रंग देऊ नये.
मेष
बदललेल्या ऋतूचा आणि तापमानाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. परिवारातील सदस्यांच्या वैयक्तिक बाबतींमध्ये हस्तक्षेप करू नका. जमल्यास प्रवास टाळावा. नोकरवर्गाला वरि÷ांचा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण. भाग्याची उत्तम साथ मिळेल. मानसन्मान वाढेल. दुरून बातमी कळू शकते.
उपायः उन्हात काम करणाऱया कामगारांना ताक वाटावे.
वृषभ
कामाकरता प्रवासाचा योग येईल. घराकरता आवश्यक तेवढाच खर्च करावा. तब्येतीला सांभाळावे. नोकर वर्गाला अनुकूल काळ आहे. जोडीदाराची साथ मिळेल. अचानक धनलाभाची शक्मयता आहे. देवदर्शन किंवा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील.
उपायः गाईला हिरवा चारा घालावा
मिथुन
कामाचा कितीही ताण असला, जबाबदारीमध्ये कितीही वाढ झाली तरी त्याचा परिणाम तब्येतीवर होऊ नये याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. परिवाराची साथ मिळेल. धनलाभ उत्तम असेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकर वर्गाची प्रशंसा होईल. वैवाहिक जीवन मधुर असेल. वाहन जपून चालवा. मानसन्मान प्राप्त होईल.
उपायः लहान मुलीला आंबट-गोड मिठाई दान करावी.
कर्क
घरात अशांतता निर्माण झाल्याने मन उदास असेल आणि चिडचिड होईल. प्रवासात नुकसान संभवते. स्थावर मालमत्तेचे आणि वाहनप्राप्तीचे योग आहेत. प्रेम प्रसंगात यश मिळेल. शत्रूंच्या कारवायांमध्ये वाढ होईल. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. मंगलकार्यात सहभागी व्हाल. भाग्याची साथ आहे.
उपायः जुन्या विहिरीमध्ये दोन चमचे दूध घालावे.
सिंह
तापलेल्या वातावरणाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. चुकीचे खाणे पिणे टाळावे. धनप्राप्तीमध्ये कमी होईल. कुटुंबीयांमध्ये वाद संभवतो. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील. कामाकरता प्रवास घडेल. शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेमप्रसंग यशस्वी होतील. शत्रू बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. वैवाहिक जीवनात तणाव असेल.
उपायः तांब्याचे पात्र दान द्यावे.
कन्या
उष्णतेचे विकार संभवतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. डोळय़ांना त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण समाधानकारक असेल. धनप्राप्ती उत्तम होईल. प्रवास घडेल. स्थावर कारकसंबंधी उत्तम ग्रहमान आहे. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा. नोकरवर्गाला त्रास संभवतो. वैवाहिक जीवन समाधानकारक.
उपायः पिंपळाच्या झाडाला दूधमिश्रित पाणी घाला.
तूळ
तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. स्वास्थ्य लाभ होईल. परिवाराची साथ मिळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासाचे योग आहेत. वाहन खरेदीचे योग आहेत. छोटय़ा गुंतवणुकीतून नुकसान संभवते. नोकरदाराना अनुकूल काळ आहे. जीवनसाथीबरोबर वाद संभवतो. भाग्याची साथ कमी आहे. कष्टाचे प्रमाण वाढवा. अति लोभ करू नये.
उपायः शुक्रवारी देवीला नैवेद्य दाखवावा.
वृश्चिक
तब्येत समाधानकारक राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. अपेक्षित धनप्राप्ती होईल. कुटुंबात मंगलकार्य संभवते. एक छोटी पार्टी आयोजित कराल. प्रवास घडेल. घरखर्चात वाढ होईल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरवर्गाला जास्त कष्ट संभवतात. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होतील.
उपायः मारुतीला मधाचा अभिषेक करावा.
धनु
आरोग्याचा पाया मजबूत होत आहे. उत्तम आरोग्याकरता व्यायामाची कास धराल. परिवारातील वातावरण अनुकूल असेल. पैशांच्या बचतीमध्ये वाढ होईल. लहान भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर वाद संभवतो. आईच्या सल्ल्यामुळे फायदा होईल. शेअर्समध्ये नुकसान संभवते. नोकरीत वादाचे प्रसंग येतील. वैवाहिक जीवन क्लेशदायक असेल.
उपायः रुईच्या पानावर शेंदूर लावून मारुतीला अर्पण करावे.
मकर
योजना यशस्वी होतील. प्रवासाचे योग आहेत. वाहनाकरता खर्च करावा लागेल. प्रेमसंबंधात दुरावा येईल. शेअर्समध्ये नुकसान संभवते. कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्मयता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. नवीन कामे मिळतील. लाभ समाधानकारक असतील. लांबून सुवार्ता मिळेल. उपायःउसाच्या रसाने शंकराला अभिषेक करावा.
कुंभ
तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याने त्रास संभवतो. सोशल मीडियामध्ये तुमची उपस्थिती लक्षणीय ठरेल. धनप्राप्ती उत्तम असेल. घरातील लोकांबरोबर आनंदात वेळ घालवाल. प्रवास टाळावा. जमिनीचे व्यवहार टाळावेत. शेअर्समध्ये नुकसान संभवते. नोकरदारांना कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव संभवतो.
उपायः सुवासिनीला सुगंधी अत्तर भेट द्यावे
मीन
तब्येत सुधारत आहे. पायाचे दुखणे कमी होईल. पैशांकरता जास्त कष्ट करावे लागतील. प्रवास शक्मयतो टाळावा. भांडणे होण्याची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात यश मिळेल. नोकर वर्गाला प्रतिकूल काळ आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेदाची शक्मयता आहे. वाहन जपून चालवावे. गुप्तवार्ता समजेल.
उपायः नियमित दत्त दर्शन घ्यावे.





