वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्येक धर्माच्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार त्या धर्मासाठी जी स्मशानभूमी निर्धारित करण्यात आली आहे, तेथेच व्हावेत, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. छत्तीसगड सरकार आणि एक ज्येष्ठ नागरिक यांच्यातील वादासंबंधीच्या याचिकेची सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. यासंबंधीचा आदेश नंतर दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
एका ख्रिश्चन नागरिकाच्या घरातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह एका विशिष्ट स्थानी दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला स्थानिक प्रशासनाने विरोध केला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले. छत्तीसगड सरकारने जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यात ख्रिश्चनांसाठीची स्मशानभूमी नेमकी कोठे आहे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने नवे प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी सूचना न्यायालयाने केली. तसेच प्रत्येक धर्माच्या लोकांनी त्यांच्या धर्मातील मृतांचे अंत्यसंस्कार त्यांच्या धर्मासाठी असलेल्या स्मशानभूमीतच केले पाहिजेत, असे मतप्रदर्शनही केले. आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढच्यावेळी अंतिम निर्णय दिला जाईल.









