कोल्हापूर / सुधाकर काशीद :
अंत्ययात्रा म्हणजे सग्या सोयऱ्यांसोबतचा अखेरचा प्रवास. आपल अंगण ते स्मशानभूमी हा प्रत्येकाच्या वाट्याला येणारा प्रवास. प्रवासाचे अंतर स्मशानभूमीच्या ठिकाणावरून थोडं कमी–अधिक. पण, हा अंत्ययात्रेचा प्रवासही अलीकडे अवघ्या काही पावलांचा झाला आहे. अखेरचा निरोप देण्यास, अंत्ययात्रेत सहभागी होण्यास अनेकांना आता वेळ मिळत नाही. त्यामुळे चार शववाहिका कोल्हापुरात सज्ज आहेत. आता वैकुंठरथ किंवा स्वर्गरथ म्हणून पाचवी शववाहिका सज्ज झाली आहे. आपले ओझं कोणाच्याही खांद्यावर न देता अखेरचा निरोप घेण्याची आणखी एक सोय झाली आहे.
काळाच्या ओघात अंत्ययात्रेच्या स्वरुपात झालेला हा बदल तसा साहजिकच आहे. दबकत दबकत कोल्हापूरकरांनीही हा बदल स्वीकारला आहे. याला कारण असे की, मित्र असो की शत्रू असो अंत्ययात्रा आणि तीही खांद्यावरूनच हा समूहप्रेमी कोल्हापुरातला प्रघात होता. अंत्ययात्रेतील प्रत्येकाने थोडा थोडा वेळ आपला खांदा देत अखेरचा निरोप देण्याचा हा प्रकार पिढ्यानपिढ्या चालू होता. गल्लीत कोणाचा मृत्यू झाला तर घरटी एक कोणीतरी अंत्ययात्रेसाठी आलाच पाहिजे हा अलिखित नियम होता. नुसतं अंत्ययात्रेत सहभागी नव्हे तर, थोडा थोडा वेळ खांदा दिलाच पाहिजे, हा देखील कायदा होता क्आणि तो कटाक्षाने पाळला जात होता. कारण मृतदेह खांद्यावरून नेण्याशिवाय दुसरी सोयही नव्हती. किंबहुना यात काही वेळा खोड्याही होत होत्या. रात्री–अपरात्री गल्लीतल्या एखाद्याचा मृत्यू झाला व अंत्ययात्रा असली तर मुद्दाम प्रत्येक घरावर थाप मारुन उठवले जात असे. कोणाचाही मृत्यू होण्याचा अवकाश गल्लीतले काही हौशी कार्यकर्ते असे होते की, ते साऱ्या गल्लीला दरवाजे ठोठावून जागे करत होते आणि अंत्ययात्रेत एखाद्या कुटुंबातला सहभागी न झाल्यास त्या कुटुंबाला इतर कार्यक्रमासाठी निमंत्रण देणे टाळले जात होते. त्यामुळे गल्लीशी नाते टिकवण्यासाठी अंतयात्रा टाळणे अशक्य होत असे आणि यातून दु:खाच्या प्रसंगी एकमेकाला साथ दिली जावी हा संदेशही प्रत्येकाला मिळत असे.
गेल्या काही वर्षात शववाहिकेची मोफत सोय महापालिकेने केली. महापालिका, टिंबर मार्केट, फुलेवाडी, ताराराणी मार्केट, प्रतिभानगर या फायर स्टेशनमध्ये महापालिकेने शववाहिका सज्ज ठेवल्या. फोन केला की अंत्ययात्रेच्या अगोदर पाच दहा मिनिटे शववाहिका दारात येऊन थांबू लागली. त्यात मृतदेह व दहा–बारा नातेवाईक घेऊन स्मशानभूमीपर्यंत येऊ लागली. इतर नातेवाईक आपापल्या गाड्यावरून त्या शववाहिकेच्या पाठोपाठ जाऊ लागले. स्मशानभूमीच्या अलीकडे पन्नास पावलावर शववाहिका थांबू लागली व तेथून स्मशानभूमीपर्यंत म्हणजे पाच पन्नास पावलाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची पद्धत रूढ झाली.
आता वैकुंठरथ, स्वर्गरथ नावाने आणखी एक थोडी सुसज्ज अशी शववाहिका सज्ज झाली आहे. त्याला चारही बाजूने मोठ्या काचा लावण्याचे काम सुरू आहे. काही दिवसात हा रथ त्याच्या कामास सुरुवात करेल. अंत्यविधी होतच राहतील पण अंत्ययात्रा मात्र कोणाच्याही खांद्यावर ओझे न देता निघत राहतील. पूर्वी खांद्यावर प्रेत घेऊन अंतयात्रा कशा निघत होत्या या कदाचित दंतकथेचा ही विषय बनून जातील.
- व्हीआयपी शववाहिका
मृत्यू सर्वांना समान असला तरी काही अंत्यविधी व्हीआयपी असतात. त्यासाठी अंत्ययात्रेची वेगळी सोय असते. ही अंत्ययात्रा उघड्या वाहनातून फुलाच्या प्रतिकात्मक रथातून निघते. त्याचीही सोय महापालिकेत आहे. अर्थात त्याचा संबंध सर्वसामान्य नागरिकांशी फारसा येत नाही.
शहरात मोफत, ग्रामीण भागासाठी ठराविक शुल्क
शववाहिकेसाठी संपर्क क्रमांक 101








