गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी दिवसभर झोडपले : आज-उद्याही मुसळधार पाऊस,मोसमातील पाऊस 130 इंच
पणजी : परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाने गोव्याला गुरुवारी सायंकाळपासून झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वास्को परिसरात सुमारे साडेचार इंच पावसाने झोडपले. कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी दिवसभर पाऊस पडत होता. यंदाच्या अधिकृत मोसमाच्या पावसाचा आज अखेरचा दिवस असून काल शुक्रवारी सायंकाळपर्यंत गोव्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 9 टक्के जादा पाऊस पडलेला आहे. यंदाच्या मोसमात शुक्रवारपर्यंत 130 इंच पाऊस पडलेला आहे. आज, उद्याही मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सरासरी 2.5 इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाची नोंद 130 इंच झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10 इंच जादा पाऊस पडलेला आहे. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात जादा पाऊस पडलेला आहे. गेल्या 24 तासांत उत्तर गोव्यात 52.4 मि. मी. म्हणजेच 2 इंच तर दक्षिण गोव्यात 68.2 इंच म्हणजेच जवळपास पावणेतीन इंच पावसाची नोंद झाली आहे.
उद्यापासून मान्सूनोत्तर पाऊस
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे हवामान खात्याच्या पुणे केंद्राने जाहीर केले आहे. परतीचा पाऊस हा फार मोठा असतो व तो धुमाकूळ घालतो. गेले 8 दिवस गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस चालू आहे. आज दि. 30 सप्टेंबर रोजी यंदाच्या मोसमातील सरकारी नियमांनुसार पावसाळ्याचा अंतिम दिवस आहे. उद्या दि. 1 ऑक्टोबरपासून सुरू होणारा पाऊस हा मान्सूनोत्तर पाऊस म्हणून गणला जाणार आहे.
आतापर्यंत 130 इंच पाऊस
केपे येथे राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 144.50 इंच पावसाची नोंद झालेली आहे. गोव्यात यंदाच्या मोसमात शुक्रवारी सकाळी 8.30 पर्यंत 130 इंचांची नोंद झाली आहे. पणजीत शुक्रवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान सातत्याने पडत राहिलेल्या पावसाने 1.50 इंच अशी नोंद केली. आज राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
दिवसभर जनजीवन विस्कळीत
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात गोव्यात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण गोव्यातले जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी झाडे पडली. अग्निशामक दलाने वेळीच ती कापून टाकून रस्ते मोकळे केले. जोरदार पाऊस सर्वत्र पडला असला तरी नदी, ओहोळांना पूर आल्याचे वृत्त नाही. कारण हा पाऊस टप्याटप्याने पडत राहिला.
पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याने दि. 28 व दि. 29 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केले होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा काही तासांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केले होते. अरबी समुद्रातून पावसाळी ढग पुन्हा एकदा पूर्वेच्या दिशेने वेगाने सरकत असल्याने मुसळधार पाऊस पडणार असा इशारा दिला होता. आज व उद्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे, तर दि. 2 ते 5 ऑक्टोबर या दरम्यान तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
सर्वाधिक 4.5 इंच दाबोळीत, सर्वात कमी वाळपईत
गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाचे प्रमाण हे गोव्याच्या किनारी भागात होते. आतील भागात पावसाचे प्रमाण हे फारच कमी राहिले. मात्र सर्वत्र काळ्याकुट्ट ढगांनी आच्छादिले होते. त्यामुळे दिवसा देखील अंधारल्यासारखे वाटत होते. सर्वाधिक 4. 5 इंच पाऊस दाबोळीत तर सर्वांत कमी अर्धा इंच वाळपई येथे झाला.
गेल्या 24 तासांतील (इंचात) पाऊस
- म्हापसा 2.5
- पेडणे 1.25
- फोंडा 3
- पणजी 3
- जुने गोवे 3
- सांखळी 1
- वाळपई 0.50
- काणकोण 1.70
- दाबोळी 4.50
- मुरगाव 4
- केपे 0.75
- सांगे 1









