वृत्तसंस्था/ मँचेस्टर
यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला बुधवारपासून येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर प्रारंभ होत आहे. इंग्लंडने या मालिकेतील तिसरा सामना जिंकून आपले आव्हान जिवंत ठेवले असल्याने या चौथ्या सामन्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ऑस्ट्रेलिया या मालिकेतील सलग पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी टिचून फलंदाजी करत ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवल्याने ही मालिका आता 2-1 अशी रंगतदार झाली आहे. हेंडिग्लेच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर तीन गड्यांनी विजय मिळवला होता. या तिसऱ्या सामन्यात खेळणाऱ्या इंग्लंड संघातील ओली रॉबिनसनला चौथ्या सामन्यासाठी वगळण्यात आले असून जेम्स अँडरसनचा अंतिम 11 खेळाडूत समावेश करण्यात आला आहे. रॉबिनसनला पाठदुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे.
इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडतर्फे दर्जेदार आणि विक्रमी कामगिरी केली आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 688 बळी मिळवले आहेत. या चालू अॅशेस मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात तो आपल्या बळींचे सातवे शतक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन तसेच ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्न हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रलिया आणि इंग्लंड यांच्यातील आतापर्यंतच्या अॅशेस मालिकेच्या इतिहासात 1928 पासून दोन्ही संघांनी आपल्या वेगवान गोलंदाजीवर अधिक प्राधान्य दिल्याचे जाणवते. या दोन्ही संघांनी 33 वर्षे किंवा त्यावरील वयोमानाच्या चार वेगवान गोलंदाजांना आतापर्यंत या मालिकेत संधी दिल्याची नोंद आहे. इंग्लंड संघांमध्ये अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड (37 वर्षे), ख्रिस वोक्स (34 वर्षे), मार्क वूड (33 वर्षे) यांचा समावेश आहे तर फिरकी गोलंदाज मोईन अली 36 वर्षे असूनही आपली कामगिरी चोख पाडत आहे.
काही आठवड्यापूर्वी मोइन अलीने आपली कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली होती. जॅक लिच याची मोईन अलीच्या जागी इंग्लंड संघात निवड करण्यात आली पण वारंवार दुखापतीमुळे लीचला संघातील आपले स्थान राखता आले नाही. त्यामुळे इंग्लिश निवड समितीने मोईन अलीला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याने मोईन अलीने या विनंतीला मान देऊन त्याने हा आपला निर्णय रद्द केल्याने त्याचा पुन्हा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला. इंग्लंड संघातील वरच्या फळीतील फलंदाज ओली पॉप याच्या खांद्याला झालेली दुखापत अद्याप पूर्ण बरी झाली नसल्याने मोईनला फलंदाजीत बढती देऊन त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे लागत आहे. रुट चौथ्या स्थानावर फलंदाजी करतो. हॅरी ब्रुक पाचव्या स्थानावर फलंदाजीस येतो. हेंडिग्लेच्या तिसऱ्या कसोटीत ब्रुकची 75 धावांची खेळी इंग्लंड विजय मिळवून देणारी ठरली. मात्र या तिसऱ्या कसोटीत मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला आणि त्याला केवळ 3 धावा जमवता आल्या होत्या. इंग्लंडच्या व्यवस्थापन समितीने मोईन अलीचे फलंदाजीतील तिसरे स्थान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कर्णधार बेन स्टोक्स आणि यष्टीरक्षक बेअरस्टो हे खालच्या क्रमांकावर संघाचा डाव सावरु शकतात.
2001 नंतर ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका जिंकता आलेली नाही. दरम्यान कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ यावेळी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करेल. चालू अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी मिळवली असून आता ते ही मालिका काबीज करण्यासाठी प्रयत्न करतील. पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या जूनमध्ये आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकताना भारताचा पराभव केला होता.
हेंडिग्लेच्या तिसऱ्या कसोटीत सलामीचा अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर हा अपयशी ठरला होता. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडसमोर तो चाचपडत फलंदाजी करत असल्याचे जाणवले. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ब्रॉडने 17 वेळा वॉर्नरला बाद केले आहे. वॉर्नर, लाबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ, हे ऑस्ट्रेलियन संघातील आघाडीचे महत्त्वाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. 2019 नंतर मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघामध्ये दमदार पुनरागमन केले आहे. हेंडिग्लेच्या कसोटीत ग्रीनच्या जागी मार्शला संधी देण्यात आली आणि त्याने शानदार शतकही झळकवले होते. ग्रीनला तंदुरुस्ती समस्येमुळे तिसऱ्या कसोटीतून वगळले होते. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. मार्श आणि ग्रीन या दोन्ही अष्टपैलूंना अंतिम 11 खेळाडूत संधी देण्यासंदर्भात ऑस्ट्रेलियासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वेगवान गोलंदाज हॅझलवूड चौथ्या कसोटीत खेळणार आहे. बोलँडच्या जागी त्याला संघात स्थान मिळेल. तिसऱ्या कसोटीत बोलँडला आपली प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. ओल्ड ट्रॅफोर्डचे मैदानावर इंग्लंडच्या दृष्टीकोनातुन लाभदायक असल्याचे जाणवते. या मैदानावर आतापर्यंत इंग्लंडने गेल्या 16 पैकी 13 कसोटी जिंकल्या आहेत. चार वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाने याच मैदानावर इंग्लंडचा पराभव केला होता. तसेच 1981 साली इयान बोथमच्या दमदार खेळीने इंग्लंडने ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर अॅशेस विजेतेपद साजरे केले होते. बुधवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असून त्यानंतरच दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू निश्चित करतील.









