प्रतिनिधी / बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वे गेट शनिवारी सकाळी चक्क अर्धातास बंद झाल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतुक कोंडी पहावयास मिळाली. चौथे रेल्वे गेट येथे शनिवारी सकाळी १०:३० वाजता इंधन वाहतूक रेल्वे थांबली होती आणि या इंधन वाहतुकीचे शेवटचे दोन टॅंक चौथ्या रेल्वे गेटच्या मधोमध थांबल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप झाला होता. कारण ही गाडी एक दोन मिनिटे न थांबता तब्बल अर्धा तास थांबली होती. त्यामुळे गेटच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतुक थांबली होती अनगोळ बाबले गल्ली कॉर्नर शिवशक्ती नगर के. एल. ई इंजिनिअरिंग महाविद्यालय व संत रोहिदास नगर अशा चारही बाजूंनी वाहणे थांबली होती. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरीकांना विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला.
गेल्या कांही दिवसापासुन आठवड्यातून दोन चार दिवस असा प्रकार घडत असल्याने वाहनचालकांना नागरीकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड याला कारणीभूत ठरत असल्याची चर्चा नागरीकांत सुरू आहे. पण याचा फटका नागरीकांना बसत असल्याने वेळेचा अपव्यय होतो आहे. त्यामुळे कामावर रुजू होण्यास आणि विद्यार्थाना कॉलेज मध्ये पोहोचण्यास विलंब झाला. अर्ध्या तासाने मालवाहतूक गाडी पुढे गेली पण त्यानंतर आणखीन एक पॅसेंजर गाडी येत असल्याने गेट बंदच होते. पॅसेंजर गाडी गेल्यानंतर गेट खुले करण्यात आले. त्यानंतर नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
चौथ्या रेल्वे गेटवरील गेटमन कर्मचाऱ्यांनी गाडीच्या शेवटी असणाऱ्या सिग्नल कर्मचारी यांना गाडी आणखीन थोडी पुढे घेण्यास सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून शेवटचे दोन डब्बे गेल्यास गेट खुले करण्यास मदत होईल. पण तसे झाले नाही. त्यामुळे नागरीकांना याचा फटका सहन करावा लागला.
अशा घटना या ठिकाणी वारंवार घडत असल्याने नागरीक तिसऱ्या दुसऱ्या गेटकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण तिथेही हीच परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तिसऱ्या गेटवरील उड्डाणपूलाचे काम संपले असले तरी शिल्लक काम अजुनही संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कधी उद्घाटन होणार आणि कधी सुरू होणार याच्या प्रतिक्षेत नागरीक आहेत. तरी लवकरात लवकर सिग्नलचा तिडा आणि रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.









