आरसीयूचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांचे प्रतिपादन : गोगटे बीबीए, बीसीए विभागांचा रौप्यमहोत्सव
बेळगाव : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते मिळविण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी. केएलएस शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून उद्योग व समाजाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याच्या दूरगामी विचारसरणीचे कौतुक करावे तितके कमीच आहे. उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय शिक्षण, नवोपक्रम व डिजीटल क्षमतेनुसार आपण वाटचाल करण्याची आवश्यकता आहे, असे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी व्यक्त केले. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीबीए व बीसीए विभागांच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. के. तगारे उपस्थित होते. केएलएस कॅम्पसमधील के. के. वेणुगोपाल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बीबीए 1996 तर बीसीए विभागाची 1999 मध्ये स्थापना करण्यात आली आहे.
दक्षता विभागाचे अतिरिक्त आयुक्त सागर देशपांडे म्हणाले, सार्वजनिक सेवा व कॉर्पोरेट जगतात सचोटी, नेतृत्त्व आणि दक्षता असायला हवी. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक ध्येयांसोबत एक मजबूत होकायंत्र विकसित करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. केएलएसचे अध्यक्ष अनंत मंडगी यांनी, गेल्या 25 वर्षांत बीबीए व बीसीए विभागांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सक्षम आणि जबाबदार व्यावसायिकांना घडविण्यासाठी संस्थेच्या अढळ समर्पणाचे त्यांनी कौतुक केले. पी. एस. सावकार यांनीही मनोगत व्यक्त केले. रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिल्व्हर ज्युबिली सेमिनार हॉलचे आणि प्लेसमेंट सेलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राम भंडारे, एस. व्ही. गणाचारी, व्ही. जी. कुलकर्णी, व्ही. एम.s देशपांडे, आर. एस. मुतालिक, पी. जी. बडकुंद्री, उदय कालकुंद्रीकर, पी. एस. कुलकर्णी, एस. पी. जोशी, राजेंद्र बेळगावकर, प्रमोद खाटवी, अतुल आलूर, उज्ज्वला मंडगी यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.









