मुख्य रस्त्याच्या बाजुच्या भागाची पडझड : पन्हाळयाच्या पायथ्याला भितीचे सावट
पन्हाळा/अबिद मोकाशी
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पडझडीची मालिका चार-पाच वर्षापासुन सुरु आहे. दर पावसाळ्यात गडाच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागाची पडझड होतेच. गेल्यावर्षी तर येथील चार दरवाजा जवळील मुख्य मार्ग खचल्यामुळे काय हाल सोसावे लागले याचा अनुभव ताजा असतानाच या नवीन रस्त्याच्या बाजुच्या तटबंदी ढासळू लागल्या आहेत. या तटबंदीमधील दगड व माती पायथ्याला असणाऱ्या मंगळवारपेठ गावाचा वेध घेत असल्याने भिती व्यक्त होवू लागली आहे.सध्या सर्वत्र पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता पन्हाळगडाच्या नवीन जिओ ग्रेट पद्धतीने बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्याजवळील तटबंदीमधील दगड व मातीने मुळ जागा सोडुन दरीच्या बाजुने सरकरण्यास सुरुवात केली. भविष्यात याचा धोका नवीन रस्त्यासह पायथ्याशी असणाऱ्या मंगळवारपेठला जाणवत आहे.
काही दिवसापुर्वी चार दरवाजा येथील तटबंदीची पडझड झाली होती. दिवसेंदिवस सुरु असलेल्या पडझडीमुळे शिवप्रेमीसह हिंदुत्ववादी संघटना व गडप्रेमी आक्रमक झाले होते. स्थानिक नागरिकांच्यावतीने देखील जिल्हाधिकारी यांना पन्हाळगडाच्या संवर्धनाबाबत निवेदन देण्यात आले आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडुनही केंद्रीय पुरात्त्व विभागाकडे संवर्धनाबाबत पाठपुरावा सुरु आहे. मात्र पुन्हा चार दरवाजा येथील तटबंदी ढासळु लागल्याने शासनास्तरावरुन तातडीने हालचाल करण्याची गरज आहे.
पन्हाळ्यासह परिसरात दरडी कोसळणे, रस्ते खचणे, झाडे, विजेचे खांब पडणे आदी धोकादायक प्रकार पावसाळ्यात नित्याचेच बनले आहेत. गतवर्षी 23 जुलै रोजी चार दरवाजा येथील तटबंदी ढासळली. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या मंगळवारपेठच्या वरील बाजुची दरड कोसळण्याच्या स्थितीत आहे. मात्र जिओ ग्रेट टेक्नालाँजी वापरुन 70 फुट खचलेला भरावाचे बांधकाम करुन भक्कम भिंत तयार केली आहे. नवीन रस्त्याच्या लगतच्या तटबंदीची मागील दीड महिन्यापुर्वी पडझड झाली होती. त्यामुळे या चार दरवाजा परिसरातील उर्वरित तटबंदी कमकुवत झाली आहेच. त्यात सोमवारी या तटबंदीमधील दगड व माती घसरु लागल्याने नवीन रस्त्यासह येथील जुना नाक्याच्या ईमारतीला धोका निर्माण झाला आहे.
नवीन रस्त्याच्या मोरीतून गडावरचे पावसाचे पाणी सोडण्यात आले आहे. पण ड्रेनेजचे पाणी हे चार दरवाजाच्या तटबंदीवरच सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्याने ड्रेनेच्या पाण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपमधून पावसाच्या पाण्याने देखील घुसखोरी केल्याने तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. तटबंदीच्या पडझडीमुळे नवीन रस्त्याला काहीही झालेले नसल्याचे ठेकेदार शिवाजी मोहिते यांनी सांगितले. सध्या पन्हाळगडावरील वाहतुक सुरळीत आहे. गडावर येण्यासाठी पर्यटकांना कोणतेही निर्बंध घालण्यात न आल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गतवर्षी झालेल्या दरडीच्या पडझडीमुळे मंगळवारपेठ येथील अनेक घरांचे नुकसान झाल्याने येथील काही कुटुंबे रस्त्यावर आली होती. अनेकांची शेती तर या तटबंदीच्या दगड-मातीमध्ये गाडली गेली. त्यात आता पुन्हा तटबंदी ढासळु लागल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. येथील ग्रामस्थांच्या स्थालांतराचा प्रश्न ऐरणी आला आहे.
पायथ्यच्या ग्रामस्थांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. या पडझडीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठविण्यात येणार आहे. येथील तटबंदीची पावसाळ्यानंतर दुरुस्ती सुरु होईल. : विजय चव्हाण(अधिकारी,भारतीय पुरात्त्व विभाग,पन्हाळा)
याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवुन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. आज झालेल्या पडझडीने गडाच्या पायथ्याशी भितीचे वातावरण पसरले आहे. : जमिर अत्तार (ग्रामपंचायत सदस्य, मंगळवारपेठ-बुधवापेठ)
मंगळवारपेठ येथे प्रत्यक्ष भेट देवुन खबरदारीच्या सुचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कुटुंबाना धोका आहे त्यांना स्थलांतर करण्यात आले आहे . : रमेश शेंडगे(तहसिलदार,पन्हाळा)









