प्रदीर्घ काळ आयुरारोग्य आपल्याला लाभावे, असे प्रत्येकालाच वाटते, हे सत्य आहे. मात्र, वाटणे आणि प्रत्यक्षात घडणे, यात मोठे अंतर असते. सर्वांनाच दीर्घायुष्याचा लाभ मिळणे अशक्यच असते. तथापि, आता ही चिंता दूर होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्याचे सूत्र शोधून काढल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांनी जणू दीर्घायुष्याचे रहस्यच शोधले आहे.
स्पेन देशाच्या बार्सिलोना विद्यापीठाच्या संशोधकांनी मारिया ब्रान्सास मोरेरा यांच्यावर केलेल्या प्रयोगांमधून हे रहस्य शोधले गेले आहे. माणसाचे आयुष्य केवळ त्याचे जीवनमान आणि आहार किंवा तत्सम भौतिक बाबी यांच्यावरच केवळ अवलंबून नसते. तर प्रामुख्याने ते त्याच्या जनुकीय संरचनेशी निगडीत असते. काही भाग्यवंतांची जनुकीय रचना अशी असते की. त्यांना निसर्गत:च दीर्घायुष्याचा लाभ झालेला असतो. मात्र, प्रत्येकाच्या जनुकीय संरचनेची स्थिती अशी नसते. मोरेरा यांच्यावराच्या संशोधनानुसार कित्येक माणसांची जनुकीय संरचना दीर्घायुष्यासाठी अनुकूल नसली, तरी ती त्याप्रमाणे नंतरसुद्धा करता येते. आपल्या शरिरात मायक्रोबायोम नावाचा घटक असतो. तो आपल्या जनुकांमध्ये स्थित असतो. या घटकाच्या ताजेपणावर आपले आयुष्य अवलंबून असते. मोरेरा यांच्यावर जेव्हा प्रयोग केले जात होते, तेव्हा या घटकाचा शोध लागला. हा नवा शोध असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे. मोरेरा यांच्या शरीरातील मायक्रोबायोम एखाद्या बालकाच्या शरिरातील मायक्रोबायोम जितके ताजे असतात, तितके असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या दीर्घायुषी आहेत. प्रत्येकाच्या शरिरात हे मायक्रोबायोम असतातच. ते प्रदीर्घ काळ ताजे ठेवण्याची औषध योजना आता शोधण्यात येत आहे. अर्थातच, हे संशोधन अत्यंत नवे आणि बाल्यावस्थेत आहे. या मायक्रोबायोम नावाच्या घटकावर आणि त्याचा दीर्घायुष्याशी असलेल्या संबंधावर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. तथापि, या महत्वाच्या संशोधनामुळे जवळपास प्रत्येकासाठी दीर्घायुष्य दृष्टीच्या टप्प्यात आल्याचे मानण्यात येत आहे.









