प्रतिनिधी /बेळगाव
वादळी पावसामुळे शहरातील विविध धोकादायक वृक्षांची पडझड झाली होती. शिवाय एका युवकालादेखील आपला जीव गमवावा लागला. या प्रकारामुळे धोकादायक वृक्षांचा प्रश्न समोर आला होता. वनखात्याला उशिराने जाग आली असून धोकादायक झाडे हटविण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी मंडोळी रोड येथील काही धोकादायक वृक्ष हटविण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहरात वृक्षांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये कमकुवत व जुनाट झाडांचा समावेश आहे. दरम्यान, वादळी पावसामुळे जुनाट झाडे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होती. अशी झाडे तातडीने हटवा, अशी मागणी होत होती. वनखात्याने झाडे हटविण्यासाठी आलेल्या अर्जांचा विचार करून कारवाईला प्रारंभ केला आहे. यंदाच्या पावसाळय़ात वृक्ष कोसळून मोठे नुकसान झाले आहे. एकाला जीवदेखील गमवावा लागला. त्यामुळे आता वनखाते धोकादायक वृक्ष हटविण्यासाठी सरसावले आहे. मात्र, ही कारवाई केवळ 4 दिवस न करता सर्व धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.
शहरात 134 वृक्ष धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, अशी धोकादायक झाडे हटविण्यासाठी मनपाने संमती दिली आहे. अशा झाडांवर वनखात्याची कुऱहाड चालणार आहे. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा, सरकारी जागा, खुल्या जागा आणि इतर ठिकाणी वृक्ष आहेत. शिवाय दरवषी वृक्षारोपण करून झाडांची संख्या वाढविली जात आहे. मात्र, जुनाट, कमकुवत झाडांच्या सर्व्हेकडे दुर्लक्ष होत असल्याने अशी झाडे धोकादायक ठरू लागली आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे गटारी, रस्ते, पेव्हर्स, ड्रेनेज वाहिन्यांच्या खोदाईमुळे झाडांची मुळे तुटली आहेत. वृक्षांचा आधारच नाहीसा झाल्यामुळे अशी झाडे अचानक कोसळत आहेत. त्यामुळे धोकादायक झाडे तोडण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
शहरातील धोकादायक झाडांचा सर्व्हे झाला आहे. झाडे तोडण्यासाठी निविदा काढण्यात आली असून लवकरच शहरातील धोकादायक झाडे हटविण्यात येणार आहेत. मनपाकडून संमती मिळाली आहे.
-मल्लिनाथ कुसनाळ, एसीएफ वनखाते









