कोल्हापूर : वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी तीन रात्र जागून अखेर वाघाटीच्या पिल्लांना त्यांच्या आईकडे सुखरूप पाठवले. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला यश आले. या कामामुळे वनकर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
पहा व्हिडिओ- वनविभाग कर्मचाऱ्यांनी तीनरात्री काढल्या जागून, अन पिल्ले गेली आईच्या कुशीत
सध्या ऊस तोडीचे काम जोरात सुरू आहे. ऊस कापल्यानंतर वाघाटीची पिले निदर्शनास येतात. काहीजण बिबट्याची पिले म्हणून त्यांना मारून टाकतात. काहीजण त्यांना सुखरूप जंगल अधिवासात सोडून देतात.
कागल तालुक्यातील गोरंबे गावातील शेतकरी महादेव चौगुले यांच्या शेतात काही दिवसांपूर्वी वाघाटीची तीन पिल्ले आढळून आली होती. आशिया खंडातील सर्वात लहान रानमांजर म्हणून ओळख आहे.
महादेव चौगुले यांनी याची माहिती वन विभागाला दिली. मांजराच्या म्हणजेच वाघाटीच्या पिल्लाना त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं आव्हान वन विभागासमोर होते. मात्र एक- दोन नव्हे तब्बल तीन रात्री जागून वनविभागाने त्यांच्या आईच्या ताब्यात पिलांना सुखरूप पोहोचवले. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री जागून नैसर्गिकरीत्या आई आणि पिल्लांची सुखरूप पुनर्भेट घडवून आणली.
यासाठी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक श्री जी. गुरुप्रसाद,वनक्षेत्रपाल श्री रमेश कांबळे, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथक कोल्हापूरचे वनक्षेत्रपाल श्री सुनील खोत यांनी विशेष मेहनत घेत हे काम तडीस लावले. हे कार्य करण्यासाठी वन्यजीव बचाव पथक वनविभाग कोल्हापूर व छ्त्रपती वाईल्डलाईफ फौंडेशन कोल्हापूर हे सलग तीन दिवस तीन रात्र कार्यरत होते.