भारत पाकिस्तानमध्ये टार्गेट किलिंग करत असल्याचे वृत्त प्रसारित
वृत्तसंस्था/लंडन-नवी दिल्ली
ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने आपल्या एका रिपोर्टमध्ये भारतावर पाकिस्तानमध्ये टार्गेट किलिंगचा आरोप केला आहे. या वृत्ताचा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला असून टार्गेट किलिंग हा प्रकार भारताच्या परराष्ट्र धोरणात बसत नसल्याचे सांगितले. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात हे आरोप खोटे असून भारताविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा हल्लाबोलही केला.
भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमधील अनेक लोकांची हत्या केल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ भारतीय आणि पाकिस्तानी गुप्तचरांच्या हवाल्याने दिले आहे. अहवालानुसार, पाकिस्तानने शेअर केलेल्या कागदपत्रांमध्ये सात प्रकरणांशी संबंधित काही पुरावे आहेत. यामध्ये साक्षीदारांचे स्टेटमेंट, अटक रेकॉर्ड, आर्थिक स्टेटमेंट, व्हॉट्सअॅप मेसेज आणि पासपोर्ट यांचा समावेश आहे. पाकिस्तानी भूमीवर केलेल्या टार्गेट किलिंगमध्ये भारतीय हेरांचा हात असल्याचे पाकिस्तानी तपास कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ‘द गार्डियन’ने या कागदपत्रांची पडताळणी केलेली नाही.
यासंबंधी पाकिस्तानने टार्गेट किलिंगशी संबंधित कागदपत्रे शेअर केली आहेत. ‘द गार्डियन’ने आपल्या अहवालात दोन्ही देशांच्या (भारत आणि पाकिस्तान) गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि पाकिस्तानी तपासकर्त्यांकडून मिळालेल्या कागदपत्रांचे दाखलेही दिले आहेत. त्यानुसार, 2019 नंतर भारताच्या परदेशी गुप्तचर संस्थेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी परदेशात हत्या घडवून आणण्यास सुऊवात केल्याचा आरोप आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग थेट भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाद्वारे नियंत्रित केली जाते. ब्रिटिश वृत्तपत्राच्या सदर अहवालात या विंगचा उल्लेख असल्याचे दिसून येत आहे.
2019 मध्ये पुलवामा हल्ल्यापासून भारतीय गुप्तचर एजन्सीने 20 हत्या केल्या आहेत. भारत या सर्वांना आपले शत्रू मानत होता. अलीकडेच पॅनडा आणि अमेरिकेत शिखांच्या हत्येचा आरोप भारतावर करण्यात आला होता. भारतीय कारवाईचा भाग म्हणून खलिस्तान चळवळीशी संबंधित शीख फुटीरतावाद्यांना पाकिस्तान आणि पाश्चात्य देशांमध्ये लक्ष्य करण्यात आल्याचेही या आरोपांतून स्पष्ट झाले आहे.









