पावसाच्या उघडिपीमुळे शेतातील कामांना जोर
वार्ताहर /किणये
तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. तसेच शिवारातील पाणी कमी झाले आहे. सध्या पावसाच्या उघडिपीमुळे शेतीच्या कामांना जोर आला आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे पाऊस व्यवस्थित होणार की नाही, याची चिंता साऱ्यांना लागून राहिली होती. मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावले आहेत. पावसाच्या प्रारंभी पावसाने हुलकावणी दिली. मात्र नंतर मुसळधार पाऊस झाला आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेत शिवारात भातरोप लागवड तसेच भात व भुईमूग भांगलण करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील मार्कंडेय नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत होती. या नदीच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. तसेच पश्चिम भागातील मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत पावसामुळे वाढ झाली होती. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत घट झालेली आहे.तालुक्यात 60टक्केहून अधिक भात रोपलागवडीची कामे झालेली आहेत.









