उत्तर प्रदेशातील घटना ः सरकारचा चौकशी आदेश
@ लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्हय़ात कबड्डी खेळाडूंना स्वच्छता गृहात ठेवलेले अन्न वाढण्यात आल्याच्या घटनेचा व्हिडीओ प्रसारित होत असल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्वरित या लज्जास्पद घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला असून क्रिडाविश्वात या घटनेमुळे संतापाची भावना आहे.
वास्तविक ही घटना काही काळापूर्वी घडलेली आहे. मात्र या घटनेचा व्हिडीओ पुन्हा एकदा प्रकाशात आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. प्रथम या घटनेची छायाचित्रे प्रसारित झाली होती. स्वच्छता गृहाच्या फरशांवर भाताची परात ठेवलेली त्यात दिसत होती. याच परातीतला भात जेवण म्हणून साधारणतः 200 कबड्डीपटूंना वाढण्यात आला होता. 18 सप्टेंबरला छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती.
सहारणपूचे क्रिडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांनी मात्र हे आरोप पूर्णतः फेटाळले आहेत. क्रिडापटूंना दिले जाणारे अन्न अतिशय चांगल्या प्रकारचे आहे. ते पूर्णतः स्वच्छ वातावरणात शिजविण्यात आले आहे. जलतरण तलावाच्या जवळ एका पारंपरिक पद्धतीच्या विटांच्या भट्टीत शिजविण्यात आले होते. भात, रोटी, भाजी आणि इतर प्रकारचे सकस अन्न खेळाडूंना देण्यात आलेले आहे. मात्र, शिजवलेले हे अन्न पुरेशा जागेच्या अभावी शिजवलेले अन्न जलतरण तलावाच्या कपडे बदण्याच्या खोलीत ठेवण्यात आले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मात्र एका खेळाडूच्या म्हणण्यानुसार भाताची परात स्वच्छता गृहात ठेवण्यात आली होती. नंतर तोच भात खेळाडूंना वाढण्यात आला. या परातीच्या शेजारी खेळाडूंनी खाऊन उरलेल्या काही पुऱयाही होत्या. काही खेळाडूंनी हा प्रकार स्टेडियमच्या अधिकाऱयांच्या दृष्टीला आणून दिला. हे अन्न स्वच्छतागृहात ठेवण्याचा प्रकार अन्न शिजविणाऱया आचाऱयांनीच केल्यानी दिसून आले. त्यानंतर या आचाऱयांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. आता खेळाडूंची कोणतीही तक्रार नाही, असे क्रिडा अधिकाऱयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.









