दोन महिन्यांतच योजना गुंडाळली : यापुढे मिळणार केवळ तांदूळ
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना जुलै महिन्यापासून तीन किलो जोंधळा वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र दोन महिन्यांतच ही योजना गुंडाळण्यात आली आहे. यापुढे केवळ प्रति माणसी दहा किलो तांदूळच मिळणार आहेत. राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत यापूर्वी रेशनकार्डधारकांना प्रती माणसी 10 किलो तांदूळ देण्याचे जाहीर केले होते. मात्र केंद्र सरकारने तांदूळ पुरवठा करण्यास नकार दिल्याने राज्य सरकारने प्रति माणसी पाच किलो तांदूळ वितरण करून उर्वरित पाच किलो तांदळाची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात डीबीटीच्या मध्यमातून जमा केली होती. मात्र रेशन दुकानदारांनी पैशाऐवजी 10 किलो तांदूळच देण्यात यावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे लावून धरली होती.
त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून प्रती माणसी 10 किलो तांदूळ वितरित करण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यापासून प्रती माणसी 7 किलो तांदूळ व 3 किलो जोंधळा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार जुलै व ऑगस्ट महिन्यात रेशन कार्डधारकांना जोंधळ्याचे वितरण करण्यात आले. रायचूर जिल्ह्यातील जेंधळ्याची आवक करण्यात आली. पण परजिल्ह्यातून जोंधळ्याची खरेदी करण्याऐवजी ज्या जिल्ह्यात जे पिक घेतले जाते ते शेतकऱ्यांकडून खरेदी करून अन्नभाग्य योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने जोंधळा खरेदी करणे बंद केले आहे. ऑगस्ट महिन्यात सुमारे अडीज हजार क्विंटल जेंधळा कमी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यातील दुकानदारांनी जोंधळ्याऐवजी प्रति माणसी दहा किलो तांदूळच वितरित केला. एकंदरीत सरकारची जोंधळा वितरणाची योजना अवघ्या दोन महिन्यांतच गुंडाळण्यात आली आहे.









