कोल्हापूर / सुधाकर काशीद :
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरच्या पुढे वालूर फाट्यापासून पुढे काही अंतरावर कळकबनवाडी गाव आहे. तेथून पुढे पायवाटेने गेले की एका उंचवट्यावर बावट्याची काठी म्हणून एक जागा आहे. ब्रिटीश राजवटीपासून तेथे प्रत्येक 25 डिसेंबरला पांढरा बावटा (झेंडा) फडकवला जातो. वाऱ्याने तो सदैव फडकत राहतो. पावसाळ्यात भिजून चिंब झालेला तो बावटा काठीला लपेटून राहतो. अर्थातच इतक्या आडवळणाला हा पांढरा बावटा कशासाठी, हा प्रश्न साहजिकच मनात येतो. उत्तर बहुतेकांना माहीत नसते. त्यामुळे या बावट्याभोवतीचे गुढ अधिक अधिकच गडद होत जाते.
पण जाणून घेतले तर हा जंगलात उंचावर एकटाच फडकणारा पांढरा बावटा म्हणजे तत्कालीन विज्ञानाची एक साक्ष आहे. आज खूप वेगवेगळ्dया अंगाने जमिनीचे, गावाचे, देशाचे, विश्वाचे नकाशे तयार करणे खूप सोपे झाले आहे. पण ज्या काळात नकाशे, गावाची हद्द, जिह्याची हद्द ठरवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान नव्हते, तेव्हा पांढऱ्या बावट्याच्या ठिकाणापासून अंतराची मोजणी केली गेली आहे आणि ही ठिकाणे ओळखण्यासाठी तेथे एका लगत एक मोठे–मोठे दगड ठेवून त्या दगडाची गरड केली आहे. त्यावर काठीला बांधलेला पांढरा बावटा फडफडत ठेवला आहे.
काळाच्या ओघात नवे तंत्रज्ञान आले. पांढऱ्या बावट्याची ठिकाणे, त्यांची ओळख हरवत गेली. पण कोल्हापूर जिह्यात अशा दोन ठिकाणांचे अस्तित्व अजूनही जपले गेले आहे. शाहूवाडी तालुक्यात कळकबनवाडी आणि मानोली येथे फडकणाऱ्या पांढऱ्या बावट्याचे आजही अस्तित्व आहे. नगर भूमापन, महसूल आणि वन विभागाने त्याचे अस्तित्व जपले आहे. त्याकाळी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही छोट्या–छोट्या गोष्टीतून विज्ञान कसे जपले गेले होते, याचे हे उदाहरण आहे.
पांढऱ्या बावट्याची ही जागा उंचावर आहे. अशा जागा निश्चित करून समुद्रसपाटीपासून उंची, प्रतलीय अंतर मोजले गेले आहे. जमीन, डोंगर, समुद्रसपाटी याचे महसुली नकाशे तयार केले गेले आहेत. महसुलात या जमीन मोजणीला अतिशय महत्त्व आहे. जमिनीची मोजणी करण्यासाठी परिसराचा नकाशा किंवा त्याचा केंद्रबिंदू तयार करण्यासाठी या बावट्याच्या जागेचा बेस म्हणून आधार घेतला जायचा. तत्कालीन ते तंत्र नेमके कसे होते, हे स्पष्ट सांगणारे अधिकारीही आता महसूल विभागात नाहीत. अर्थात तो इतिहास झिरपत झिरपत जेवढा कळाला आहे. त्यावर पांढऱ्या बावट्याची निशाणी काही ठिकाणी जपली गेली आहे आणि तत्कालीन त्या यंत्रणेबद्दलची कृतज्ञता आजही व्यक्त केली जात आहे.
अर्थात पांढऱ्या बावट्याची नेमकी यंत्रणा कशी होती, हे जुन्या कागदपत्रांवरून संदर्भावरून अधिक स्पष्ट होऊ शकणार आहे आणि तो इतिहास नव्या पिढीला कळण्याची किंवा कळून घेण्याची घेण्याची गरज आहे. कोल्हापूर जिह्यात कळकबनवाडी आणि मानोली येथे अशी पांढऱ्या बावट्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे जाणकारांनी हौशी अभ्यासकांनी खोलवर माग काढण्याचा प्रयत्न केल्यास तत्कालीन महसुली नकाशा पद्धतीचे दडलेले ज्ञान नव्या पिढीसमोर येणार आहे आणि सलाम करण्यासारखे हे त्या काळचे तंत्रज्ञान आहे.
- अजूनही सलाम
पांढऱ्या बावट्याच्या काठीचे तंत्रज्ञान आता कालबाह्य झाले असले तरीही त्याचा मूळ पाया खूप महत्त्वाचा आहे. आम्ही महसूल नगर भूमापनच कर्मचारी, अधिकारी अजूनही पांढऱ्या बावट्याला सलामच करतो. प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला या काठीवर नवा पांढरा बावटा फडकतो. ही जागा ओळखण्यासाठी दगडावर दगड रचून एक गरड व त्यावर बावटा लावला जातो. त्या काळात या दगडाच्या गरडीवर तीस ते चाळीस फूट उंच लाकडाचा रँप केला जात होता. त्यावर बसून काम केले जात होते. दुर्बिणीचाही वापर होत होता, अशी माहिती आहे. अर्थात ही पद्धत नेमकी कशी होती, हे कागदावर येणे नव्या पिढीसाठी तर गरजेचे आहे.
किरण माने, उपअधिकारी, भूमी अभिलेख विभाग, करवीर








