चोरटय़ा मार्गांनी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची चढाओढ
वार्ताहर / रामनगर
दूधसागर धबधब्याचे मनमोहक दृश्य पर्यटकांचा मोह आवरू शकत नसल्यामुळे अनेक पर्यटक चोरटय़ा मार्गांनी धबधबा पाहण्यासाठी जात आहेत
कर्नाटक व गोवा सीमेलगत पश्चिमघाट सहय़ाद्रीच्या डोंगरात वाहणाऱया दूधसागर धबधब्याने आता रैद्ररुप धारण केले असून बरेच पर्यटक रेल्वेद्वारे जाऊन आपल्या मोबाईलमध्ये धबधब्याचे फोटो काढत आहेत. पर्यटकांना सदर धबधबा जवळून पाहण्याचा मोह आवरत नसल्याने या ठिकाणी तैनात पोलिसांची नजर चुकवून ते धबधब्याचा आनंद लुटत आहेत. दूधसागर धबधब्याकडे जाण्यास रेल्वे विभागातर्फे बंदी असूनही 15 दिवसांपूर्वी सदर धबधबा पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून 4 ते 5 हजार पर्यटक रविवारी दाखल झाले होते. या ठिकाणी असलेले 2 ते 3 रेल्वे विभागाचे पोलीस इतक्या पर्यटकांचे नियंत्रण करू न शकल्याने शनिवारी-रविवारी धबधब्याच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात येत आहे. यामुळे आता काही पर्यटक इतर दिवशी नजर चुकवून धबधब्याचा आनंद घेत आहेत.
काही पर्यटक सदर धबधब्यावर जाऊन मद्यपान करून धिंगाणा घालणे, पाण्यात पडून जिवाशी खेळत होते. तसेच पुन्हा परत जाण्यासाठी रेल्वे अधिक वेळ थांबत नसल्याने रेल्वेचे नुकसान करत असल्याने दूधसागर धबधब्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदीतही काही पर्यटक धबधबा पाहण्यासाठी जाताना दिसून येत आहेत. 4 महिनेच प्रवाहित होणाऱया या धबधब्याकडे जाण्यासाठी पुन्हा परवानगी द्यावी, अशी मागणी पर्यटक करत आहेत.









