विधानसौध परिसरातील मंडपांमध्ये शांतता
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी आंदोलनकर्त्यांचा ओघ कमी झाला होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आंदोलनकर्त्यांसाठी उभारलेल्या मंडपात शुकशुकाट पाहावयास मिळाला. मागील दहा दिवसांपासून गजबजलेले आंदोलनस्थळ गुरुवारी निमर्नुष्य झाले. हिवाळी अधिवेशनात दररोज दहा-बारा आंदोलने होतात. मात्र गुरुवारी केवळ मोजकी चार ते पाच आंदोलने झाली. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज तीन दिवसांनी कमी झाले आहे. माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे मंगळवारी आणि बुधवारी सभागृहातील कामकाज झाले नाही. शिवाय महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरात 27 आणि 28 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनातील कामकाज एक दिवस कमी करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण तीन दिवस कामकाज कमी झाले. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी उपलब्ध दिवसांमध्येच आंदोलन करून मागण्या मांडल्या. राज्यातील विविध भागातून आंदोलनकर्ते दाखल झाले होते. त्यामुळे मागील दहा-बारा दिवसांपासून आंदोलनस्थळ गजबजले होते. गुरुवारी मात्र शेवटच्या दिवशी आंदोलनकर्त्यांचा ओघ कमी झाल्याने शांतता पसरली होती.









