कसबा बीड / विश्वनाथ मोरे :
कोल्हापूर हा सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण पावसाळ्यामध्ये नद्यांना येणारा महापूर म्हणजे कोल्हापूर पश्चिम भागातील शेतक्रयाचे मरणच समजले तरी वावगे होणार नाही. पावसाळा आला की नदीकाठाला असणारे शेतकरी हा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. पोटच्या लेकराच्या जीवाप्रमाणे पिकासाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो.पण या तीन महिन्यांमध्ये विशेष करून जून व जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज न होता त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी महापुराच्या माध्यमातून फिरते.
शेतकरी निसर्गाच्या जीवावर व स्वकष्टावर नफा झाला तरी किंवा नाही झाला तरी शेती करत असतो. यासाठी सुरुवातीपासून पीक कापणीला येईपर्यंत तो सर्व खर्च प्रसंगी कर्ज काढून करत असतो. वर्षातील नऊ महिने अतिशय चांगल्या पद्धतीने शेती जीव की प्राण करत करतो. मात्र कोल्हापूरमध्ये महापूर एक मोठे संकट आहे, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते. गेल्या काही वर्षांत कोल्हापूर,सांगली आणि इतर जिह्यांमध्ये पूर येऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक नुकसान झाले आहे.
महापुराची अनेक कारणे आहेत. यामध्ये पावसाची अनियमितता, नदीपात्रातील बांधकामे व नदीकाठच्या जमिनीतील उचलली जाणारी माती, धरणातून पाणी सोडणे, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांनी महापूर व त्याचे क्षेत्र याची व व्याप्ती वाढत असते.त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था ठप्प, आरोग्यासाठी धोका, अर्थव्यवस्था आणि रोजगारावर परिणाम अशा अनेक अडचणी या नागरिकांना सहन कराव्या लागतात.
- महापुरासाठी उपाययोजना
नदीपात्रातील अनावश्यक बेकायदेशीर बांधकामे आणि भराव हटवून पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. धरणांतून सुटणाऱ्या पाण्याचा योग्य नियोजन करून पाणी सोडावे लागेल. पूर नियंत्रण योजना तयार करणे, ज्यात नदीपात्राचे संरक्षण, पूरग्रस्तांसाठी मदत आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांचा समावेश असेल. लोकांना पुराच्या धोक्याबद्दल जागरूक करणे, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तयारी करणे आणि लोकांना मदत करणे आवश्यक आहे.
- महापूरावर मात करण्यासाठी योग्य ती कार्यवाही
गेल्या काही वर्षांमध्ये दोन वेळा महापूर येऊन गेला त्यामध्ये पाडळी खुर्द, कोगे, महे,कसबा बीड,आरे,सावरवाडी, शिरोली दुमाला, बाचणी, बहिरेश्वर, आदी गावामध्ये महापूर आला होता. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासन व कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यावतीने ज्या ज्या भागांमध्ये महापूर येतो. तेथे महापूर रेषा आखणी केलेली आहे. त्या भागातील नागरिकांना तशा लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. पर्यायी महापूर संकटावर मात करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
– प्रसाद संकपाळ, कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.
- शेतकऱ्यांनो जागरूक व्हा
कोगे कुडित्रे दरम्यानचा पूल, बालिंगा दोनवडे दरम्यान सध्या काम चालू असलेला पूल व टाकलेला भराव यामुळे आमच्या गावातील नदीकाठच्या शेत जमिनीला नुकसान होणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक होऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
–संतोष मोरे, कोगे








