जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची गोकाक काळजी केंद्राला भेट : नदी काठावरील गावातील नागरिकांचे स्थलांतर
बेळगाव : पुरामुळे आणि नदी पात्रातील पाणी निवासी वसतीमध्ये शिरल्याच्या पार्श्वभूमीवर गोकाक तालुक्यातील नागरिकांचे काळजी केंद्रामध्ये स्थलांतर करण्यात आले असून सदर काळजी केंद्रांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट देऊन पूरग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, असे सांगून दिलासा दिला. जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी परिसरात असणाऱ्या गावांना पुराने वेढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने गोकाक, अथणी, कागवाड, मुडलगी, चिकोडी, हुक्केरी आणि निपाणी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. काळजी केंद्रामध्ये जेवणाच्या व्यवस्थेसह मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
गोकाक तालुक्यातील शहरातील सरकारी शाळांमध्ये व पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या काळजी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रामध्ये आश्रय घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सरकारकडून पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. कोणत्याही कारणाने भीती बाळगू नये, असे त्यांनी सांगितले. जेवणासह वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नदी काठावरील काही ग्रामस्थांनी स्थलांतर होण्यास विरोध केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, प्रत्येक जीव महत्त्वाचा असून काळजी केंद्रामध्ये प्रत्येकाची सोय करण्यात येत आहे. नागरिकांनी सदर केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गर्भवती महिलांशी संवाद साधून आरोग्याची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी गोडचिनमलकी व गोकाक धबधब्याला भेट देऊन आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची सूचना केली. यावेळी गोकाक तहसीलदार मोहन भस्मे, नोडल अधिकारी बसवराज कुरिहुली आदी उपस्थित होते.
साहाय्यवाणीची सोय
नदीकाठावरील ग्रामस्थांना पुरामुळे कोणतीही समस्या अथवा नागरिक धोक्यामध्ये सापडल्यास साहाय्यवाणी केंद्राला फोन करून संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. यासाठी पूर साहाय्यवाणी केंद्र 0831-2407290, पोलीस साहाय्यवाणी 0831-2474054, तत्काळ साहाय्यवाणी 112 या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी आवाहन त्यांनी केले.









