एक लाखाहून अधिक लोक प्रभावित : अनेक गावे महापुराच्या विळख्यात
वृत्तसंस्था /गुवाहाटी
आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर होत चालली आहे. राज्यातील अनेक भागात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नवीन क्षेत्रेही पाण्याखाली गेली आहेत. दहा जिल्ह्यातील सुमारे 1.20 लाख लोकांना पुराचा फटका बसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. भयावह पूरस्थिती असलेल्या भागात भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने गुऊवार आणि शुक्रवारसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आसाममधील नलबारी येथील मोईरंगा गावात संततधार पावसामुळे काही घरे वाहून गेली आहेत. तसेच शेती-भातीचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली असून मदत व बचावकार्य सुरू आहे. लष्कर, निमलष्करी दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, नागरी प्रशासन, गैर-सरकारी संस्था आणि स्थानिक लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून 1,280 लोकांना वाचवले.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) पूर अहवालानुसार, बाक्सा, बारपेटा, दररंग, धेमाजी, धुबरी, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी येथे पुरामुळे 1,19,800 लोक बाधित झाले आहेत. नलबारी जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून सुमारे 45,000 लोक त्याच्याशी झुंज देत आहेत. यानंतर बक्सामध्ये 26,500 आणि लखीमपूरमध्ये 25,000 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. प्रशासनाने पाच जिल्ह्यांमध्ये 17 मदत शिबिरे उभारली आहेत. 2,091 लोकांनी येथे आश्र्रय घेतला आहे. सद्यस्थितीत आसाममधील सुमारे 780 गावे पाण्याखाली आहेत. तसेच 10,591.85 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. याशिवाय बक्सा, बारपेटा, सोनितपूर, धुबरी, दिब्रुगड, कामरूप, कोक्राझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, दक्षिण सलमारा आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणावर मातीची धूप झाल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन आणि मुसळधार पावसाची माहिती मिळाली आहे. पुराच्या पाण्यामुळे बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे.









