रत्नागिरी: प्रतिनिधी
तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. हरचेरी येथील काजळी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने काजरघाटी मार्गे होणारी लांजा वाहतूक बंद झाली आहे. समुद्राच्या भरतीची वेळ व मुसळधार कोसळणारा पाऊस यामुळे पाणी वाढत आहे. सध्या बाजारपेठेच्या रस्त्यावर पाणी आले असून व्यापारी आपला माल सुरक्षित स्थळी हलवत आहेत.
रत्नागिरीत आभाळ फाटल्यागत कोसळणाऱ्या पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. बुधवारी पहाटेपासून ते अगदी दिवसभर या अतिमुसळधार पावसाने जणू कहर केला. त्यामुळे जनजीवन पभावित झालेले आहे. अनेक भागात नद्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे काही मार्गावर पाणी आल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदी आणि बावनदी परिसरात आलेल्या पुराने किनारी भागातील शेती पाण्याखाली गेल्याची स्थिती होती.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांपर्यंत कोकणाला रेड अलर्ट दिलेला आहे. त्याचा परिणाम गेल्या दोन-तीन दिवसांपासून याठिकाणी जाणवत आहे. मुसळधार पावसाचे संपूर्ण जिल्हाभरात धुमशान सुरू आहे. मोठ मोठमोठ्या काही नद्या धोक्याच्या पातळीनजिक तर काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावेळेस पावसाचा जोर गेल्या काही दिवस अगोदर काहीसा कमी होता. पण आता तर या पावसाने सर्वत्र जोरदार पुनरागमन केलेले आहे. त्यामुळे जिल्हाभर पाणीदार स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मंगळवारपासून या पावसाने सर्वत्र पुन्हा चांगलाच जोर धरला आहे. यादिवशी रात्री तसेच बुधवारी पहाटेपासून अगदी दिवसभर रत्नागिरीला या पावसाने अक्षरश झोडपून काढल्याची स्थिती होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल बनले होते. अनेक भागात आलेल्या नद्यांना पुरस्थितीमुळे तेथील जनजीवन पभावित बनलेले होते. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली होती. यादिवशी सकाळपासून अगदी दुपारपर्यंत नदीच्या पूराचे पाणी चांदेराई पुलाच्या कठड्यापर्यंत येउन पेहचलेले होते. त्यामुळे या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी अगोदरच पूरस्थितीच्या शक्यतेने सावध पवित्रा घेतलेला होता.
या परिसरात काजळी नदीला आलेल्या पुरामुळे सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई या किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याचे चित्र निर्माण झालेले होते. अशीच पूरस्थिती कायम राहिल्यास लगतच्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता या परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे. निवळी बावनदी परिसरातही अशीच पुरस्थिती निर्माण झालेली होती. बावनदी देखील धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. त्या पूराचे पाणी निवळी परिसरात लगतच्या शेतीमध्ये पसरल्याने शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत होते. त्याचबरोबर तालुक्यातील केळये म्हामुरवाडी या भागातील नागरिकांना मुसळधार पावसाचा फटका बसला. येथील नदीच्या पूराचे पाणी रस्त्यावर आल्याने या वाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.