पाऊस कमी झाल्यामुळे नदीकाठ परिसरातील शेतीकामांना मिळणार गती
बेळगाव : मागील आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांसह सारेच जण समाधानी झाले. संपूर्ण जून व जुलैच्या 20 तारखेपर्यंत पाण्याचा ठणठणात असलेल्या मार्कंडेय नदीमध्ये आता मोठ्याप्रमाणात पाणी प्रवाहीत झाले आहे. यामुळे परिसरातील पिके पाण्याखाली गेली होती. दरवर्षीच याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. आता मात्र पाऊस कमी झाल्याने पूरही ओसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. कंग्राळी खुर्द येथील असणारे जुने पूल यावर्षीं मागील 5 ते 6 दिवसांपासून पाण्याखाली गेले होते. परिसरात असणाऱ्या शेतीमध्ये काही प्रमाणात पाणी शिरले आहे. शुक्रवारी पाऊस कमी झाल्याने आता नदीकाठ परिसरातील पाणी कमी होत असून शेतीकामांना जोर येणार आहे. अनेक ठिकाणी भातरोप लागवड सुरू असली तरी नदीकाठ परिसरात भात लागवडीचे काम थांबले होते. आता ते पुन्हा जोरदार सुरू होणार आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदीकाठ परिसरात भात लागवड करण्याचे काम थंडावले होते. शुक्रवारी पाऊस कमी झाल्याने शेतीकामांना चालना मिळाली. नदीकाठ परिसरातील काही भागात अजूनही पाणी असून ते एक दोन दिवसात जाण्याची शक्यता आहे.









