उड्डाणांना उशीर होत असल्याने प्रवाशांतून संताप
बेळगाव : बेळगावमधून उड्डाण घेणारी बरीच विमाने वेळेत दाखल होत नसल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारी तिरुपती व जयपूर या दोन्ही शहरांना जाणारी विमाने बऱ्याच उशिराने दाखल झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. महिनाभरापूर्वी जादा दराने तिकीट बुकिंग करूनही प्रवास मात्र उशिरानेच होत असल्याने संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. बेळगावमधून मध्यंतरीच्या काळात अनेक विमानसेवा बंद झाल्या. उर्वरित सुरू असणाऱ्या सेवाही अनियमित असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत आहे. विमान प्रवासासाठी बेळगावपेक्षा हुबळी किंवा गोवा परवडते, म्हणण्याची वेळ बेळगावच्या प्रवाशांवर आली आहे. मागील दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक विमानफेऱ्या रद्द झाल्या. विमानप्रवासी विमानतळावर दाखल झाल्यानंतर बऱ्याचवेळा विमान रद्द केल्याने प्रवाशांना माघारी फिरावे लागले. याची नाराजी प्रवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्तही केली होती. बुधवारी बेळगाव-तिरुपती या मार्गावर उड्डाण केलेले विमान सकाळी 9.15 वाजता दाखल होणार होते. यामुळे प्रवासी सकाळी 7 वाजल्यापासून विमानतळावर दाखल झाले. दुपारचा 1 वाजला तरी विमान दाखल होत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तब्बल चार तास विमानाला उशीर झाल्याने पुढील प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांचा पूर्ण प्लॅन फिसकटला. त्यामुळे प्रवासी व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. बेळगाव-जयपूर मार्गावर दोनच दिवसांपूर्वी नवीन विमानफेरी सुरू झाली. उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच फेरीत हे विमान दीड तास उशिराने दाखल झाले. लहान एअरक्राफ्ट बाबतीतच वारंवार अशा समस्या का येताहेत? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. विमानतळ संचालकांनी संबंधित विमान कंपन्यांना जाब विचारावा, अशी मागणी होत आहे.









