सेन्सेक्स 260.30 तर निफ्टी 97.70 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील मागील पाच सत्रांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी तेजीचा माहोल राहिला होता. जागतिक पातळीवरील घडामोडी व देशातील लोकसभेच्या निवडणुकीचे वारे यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली होती. याचा नकारात्मक परिणाम हा गुरुवारी भारतीय बाजारात राहिला होता.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 260.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,664.47 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 22,055.20 वर बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्समधील 9 समभाग हे नुकसानीत राहिले होते तर 21 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यावेळी निफ्टीमधील 38 समभागांमध्ये तेजी आणि 12 समभागांमध्ये घसरण राहिली होती.
भारतासोबत जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये काळजीचे वातावरण राहिल्याने चालू आठवड्यात बाजारात पाच सत्रे ही घसरणीसोबत बंद झाली आहेत. मात्र अंतिम सत्रात बाजारातील वातावरण काहेसे सकारात्मक राहिले होते. मुख्य कंपन्यांमध्ये निफ्टीमध्ये भारत पेट्रोलियम, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, हिरोमोटो आणि आयशर मोर्ट्स याच्यासह बीपीसीएल यांचे समभाग हे 4.50 टक्क्यांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा समूहातील कंपन्यांमध्ये आयटी कंपनी टीसीएसचे समभाग 1.65 टक्क्यांनी प्रभावीत झाले होते तर सिप्ला, कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिस यांचे समभागही नुकसानीत होते.
जागतिक बाजारात शुक्रवारी उत्साह दिसून आला. अमेरिका, युरोप व आशियाई बाजारात तेजीचा कल पाहायला मिळाला. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 60 अंकांनी तर नॅसडॅक 43 अंकांनी तेजीत होता. आशियाई बाजारात निक्केई 155 अंकांनी तर हँगसेंग तर तब्बल 425 अंकांनी तेजीत होता.








