यंदाचा हंगाम समाधानकारक : 1 जून पासून 61 दिवसांची बंदी
प्रतिनिधी /मडगाव
यंदाचा मासेमारी हंगाम 31 मे रोजी संपत असून मच्छीमार जाळी गुंडाळण्याच्या तयारीला लागले आहेत. यंदाचा हंगाम अत्यंत समाधानकारक झाल्याचा दावा मच्छिमारांनी केला असून 1 जून पासून 61 दिवस सकारात्मकतेने व्यवसाय बंद ठेवत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
गोव्यातील सर्वात मोठय़ा मासेमारी जेटी पैकी एक असलेल्या कुटबण जेटीवर अनेक मच्छिमारांनी त्यांचे ट्रॉलर / बोटी आधीच नांगरून ठेवल्या आहेत आणि शेकडो मजुरांनी त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी त्यांच्या बॅगा बांधण्यास सुरुवात केली आहे. पावसाचे लवकर आगमन झाल्याने मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून परावृत्त केले आहे.
आणखीन मासे पकडण्याच्या आशेने, काही बोटी / ट्रॉलर मालक साल नदीत नांगर टाकण्यापूर्वी शेवटच्या वेळी समुद्रात उतरले आहेत. मच्छिमारांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, अनेक स्थलांतरित मजुरांनी त्यांच्या मूळ गांवी परत जाण्यासाठी आधीच त्यांची रेल्वे तिकिटे बुक केली आहेत आणि काही आधीच राज्याबाहेर गेले आहेत.
मासेमारीचा हंगाम समाधानकारक
गेल्या वषीच्या तुलनेत यंदा मासेमारीचा हंगाम समाधानकारक झाल्याची माहिती ट्रॉलर मालकांनी दिली. 61 दिवसांनंतर सुरू होणारा आगामी हंगाम देखील असाच समाधानकारक होण्याची अपेक्षा मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. यांत्रिक मासेमारीवर 61 दिवसांची दीर्घ मासेमारी बंदी 1 जूनपासून लागू होत आहे आणि काही दिवस शिल्लक असताना, बहुतेक मासेमारी जहाजांनी आधीच नांगर टाकला आहे आणि अनेक कामगारांनी जाळी गुंडाळून सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत. अनेक बोट / ट्रॉलर मालकांनी आधीच त्यांच्या कामगारांना दिलासा दिला आहे.
कुटबण जेटीवर मासेमारी हंगामाची समाप्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक ट्रॉलर साफ करताना दिसून येतात आणि खलाशी त्यांच्या मूळ राज्यांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. बहुसंख्य कामगार जूनच्या पहिल्या आठवडय़ात गोवा सोडतील आणि दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर परत येतील अशी अपेक्षा आहे.
गोव्याचा यांत्रिकी मासेमारी उद्योग पूर्णपणे स्थलांतरित मनुष्यबळावर अवलंबून आहे. मासेमारीच्या हंगामापूर्वी कामगारांच्या शोधात ट्रॉलर मालक झारखंड, ओरिसा किंवा आंध्र प्रदेशात जात असतात व तेथून आवश्यक मनुष्यबळ आणतात. कुटबण ट्रॉलर्स मालक संघटणेचे अध्यक्ष प्रँको मार्टिन्स म्हणाले की, स्थलांतरित कामगार 3 जूनपासून त्यांच्या मुळ गांवी जाण्यासाठी जेटी सोडण्यास सुरवात करतील. तथापि, पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी मनुष्यबळाचा त्रास सुरूच राहील.
‘ 2021 च्या तुलनेत यंदाचा मासेमारी हंगाम समाधानकारक होता. 500 हून अधिक बोट / ट्रॉलरची एकूण उलाढाल करोडो रुपयांची झाली’ असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अनेकांनी आधीच त्यांची जहाजे नांगरली आहेत आणि काही मजूर त्यांच्या मूळ ठिकाणी गेले आहेत. मनुष्यबळाशी संबंधित समस्या बोट / ट्रॉलर मालकांना सतावत आहे. पुढील हंगामात हे मजूर उपलब्ध होतील याची आम्हाला खात्री नाही. मच्छीमार मजुरांमुळे खूप संघर्ष करावा लागत आहे. कारण, त्यांना पूर्णपणे अवलंबून राहावे लागते ते बाहेरच्या मजूरावर
जहाजांमधून मासेमारीची जाळी उतरवण्यास सुरुवात झाली आहे. जहाजांमधून उतरवलेली जाळी एकतर जेटीकडे जाणाऱया मुख्य रस्त्याच्या कडेला सुकविण्यासाठी ठेवली गेली किंवा बोट मालकांच्या निवासस्थानी पोचली आहे. गेल्या काही दिवसांतील खराब हवामानामुळे अनेकांना समुद्रात जाता आले नाही. पण एकूणच हा हंगाम चांगला होता.
दरम्यान, साल नदीच्या मुखावर रेती पट्टानिर्माण झाल्याने कुटबण जेटीवरील ट्रॉलर्सना त्रास होत आहे, रेती पट्टय़ाचा हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. किमान पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकारने हा प्रश्न सोडवावा, अशी मच्छीमारांचा मागणी आहे. कुटबण बोट्स / ट्रॉलर्स असोसिएशनने तक्रार केली आहे की, नदीच्या मुखाशी असलेल्या वाळूच्या पट्टीमुळे मासेमारीच्या कामात अडथळा येत आहे. नदीच्या मुखाची अवस्था बिकट असून, त्यामुळे ट्रॉलर्स समुद्रात नेणे कठीण होत असते. तसेच समुद्रात निघालेल्या बोटी कमी भरतीच्या वेळी आत येऊ शकत नाहीत. त्या फक्त भरती-ओहोटीच्या वेळी आत जाऊ शकतात.
विशेष म्हणजे रेती पट्टय़ामुळे याआधी अनेक बोटी पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. साल नदीच्या मुखाशी वाळूचे पट्टे तयार होऊ नयेत म्हणून मच्छिमारांना एक संरक्षक भिंत हवी आहे.









