प्रतिनिधी / वास्को
मच्छीमारी खात्याने बुधवारी सकाळी जेटीकडे जाणारा रस्ता रोखून धरल्याने वास्को खारवीवाडा येथील धक्क्याजवळ गजहब माजला. मासेमारी व्यवसायीकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करताना असा निर्णय घेण्यापूर्वी मच्छीमार व्यवसायीकांना विश्वासत घ्यायला हवे होते असे स्पष्ट करून मच्छीमारी खात्याच्या तडकाफडकी कृतीमुळे मच्छीमारांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्कोतील मच्छीमारी व्यवसायीकांकडे सरकार साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या व्यवसायीकांनी केला आहे.
पणजी, कुटबण प्रमाणेच वास्कोतही मच्छीमार खात्याने बुधवारी सकाळी मच्छीमारी व्यवसायीकांविरूध्द कारवाई केली. खारवीवाडा येथील मच्छीमारी धक्क्याकडे जाणारा रस्ता मच्छीमारी खात्याचे अधिकारी व पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे सर्व मच्छीमार व्यवसायीकांना धक्काच बसला. या व्यवसायीकांनी चौकशी केली असता, मच्छीमारी खात्याकडे व्यवसायाची नोंदणी केली जावी अशी खात्याची मागणी असल्याचे त्यांना समजले. हे व्यवसायीक अशा नोंदणी संदर्भात अनभिन्न होते असे दिसून आले. धक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करण्यात आल्याने ट्रॉलरमधून आलेली मासळी त्यांना बाहेर काढताच आली नाही. अनेक तास ही मासळी धक्क्यावरच पडून राहिली. त्यामुळे मच्छीमारी खात्याच्या कारवाईबाबत अखिल गोवा मच्छीमारी ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री जुझे फिलीप डिसोजा व इतर व्यवसायीकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मच्छीमारी व्यवसायीकांनी कसली नोंदणी करायची बाकी होती याची आम्हाला कल्पनाच नव्हती. मच्छीमारी खात्याची एखादी नोंदणी करायची असल्यास त्यांनी आम्हाला तशी कल्पना द्यायला हवी होती. आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. परंतु खात्याने आम्हाला बेसावध ठेऊन ही कारवाई केलेली असून हा आमच्या व्यवसायावर अचानक झालेला हल्ला आहे अशी तीव्र प्रतिक्रीया जुझे फिलीप डिसोजा यांनी व्यक्त केली. सरकारची ही चूक आहे. आमचा प्रत्येक ट्रॉलर नोंद झालेला आहे. आम्ही परवाना शुल्कही भरतो. आताच ही कसली नोंदणी आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खारवीवाडय़ावरील जेटी वाईट अवस्थेत आहे. कुठली सेवासुविधा नाही. ऑक्ट्रोय मिळत नाही. व्यवसाय चालत नाही. मच्छीमार व्यवसायीकांची विचारपुसही कोणी करत नाही. उलट त्यांची सतावणुक होत असल्याचे यावेळी इतर मच्छीमार व्यवसायीकांनी स्पष्ट केले. मच्छीमारी खात्याच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यवसायीकांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागलेले आहे. मच्छीमार खात्याने आम्हाला विश्वासात घेऊन चर्चा केली असती तर ही नुकसानी टाळता आली असती. अनेक तास मासळी धक्क्यावरच राहिल्याने ती खराब झाली. आता नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न जुझे फिलीप यांनी व्यक्त केला आहे.









