मालवण मच्छीमार संघटनेचे पोलिसांना आवाहन
आमच्या आया बहिणीचे अश्रू वाया जाऊ देणार नाही ; हिंमत असेल तर समोर या मच्छिमार बांधवांचा इशारा
कट्टा / वार्ताहर
कट्टा येथे मासे विक्री करणाऱ्या मालवण मधील सहा महिला मच्छिमारांच्या शिल्लक राहिलेल्या बंद पेटीतील सुमारे सव्वा लाख रुपयांचा माशांवर अज्ञात व्यक्तीने फिनेल, मुंग्यांची पावडर, ब्लिचिंग पावडर अशा प्रकारची विषारी द्रव्ये टाकून मासे खराब करण्याचा व काही मोठे मोठे मासे चोरून नेण्याचा निंदनीय प्रकार शनिवारी घडला. या प्रकाराची मालवण मच्छिमार संघटनेने व मच्छिमार बांधवांनी गांभीर्याने दखल घेतली. घडलेल्या विषया संदर्भात मालवण येथे याबाबत बैठक घेऊन त्या सहा महिला मच्छी विक्रेत्यांच्या पाठीशी मच्छिमार संघटना ठामपणे उभी आहे. हा निंदनीय प्रकार ज्या कुणी विकृत व्यक्तीने केला असेल त्याचा शोध घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या महिला भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास असून पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्या पद्धतीने तपास करावा. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. आम्ही मच्छिमार संघटना पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग यांची या संदर्भात भेट घेणारच आहोत.









