इमारती आग प्रतिबंधक असणार
लाकडी गगनचुंबी इमारती तयार करण्यासाठी जगभरात चढाओढ सुरू आहे. यासंबंधीचा विक्रम यापूर्वी नॉर्वेतील माजोसा सरोवरच्या काठावर 85 मीटर उंचीचा टॉवर माजोस्टारनेटच्या नावावर होता. यात फ्लॅट, एक हॉटेल आणि एक स्वीमिंग पूल आहे. 2022 मध्ये अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील 87 मीटर उंच इमारत असेंटने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आता कॅनडाच्या ओंटारियोमध्ये 90 मीटर तर स्वीत्झर्लंडमध्ये 100 मीटरच्या स्कायस्क्रेपरच्या योजनेवर काम सुरू आहे.
मागील आठवड्यात स्वीडनने जगातील सर्वात मोठे लाकडी इमारतींचे शहर निर्माण करण्याची घोषणा करत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘स्टॉकहोम वुड सिटी’ सिक्लामध्ये तयार केली जाणार आहे. 2.5 लाख चौरसमीरटच्या स्थळी रेस्टॉरंट आणि दुकानांसोबत 2 हजार घरं आणि 7 हजार ऑफिसेस तयार केली जातील. सुमारे 11,500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प स्वीडनची सिटी डेव्हलपमेंट कंपनी एट्रियम जुंगबर्गच्या निर्देशात 2025 मध्ये सुरू होणार आहे.
इमारती पर्यावरणस्नेही

आधुनिक प्रकल्पांप्रमाणे वुड सिटीच्या घरांच्या पायाकरता काही प्रमाणात काँक्रिट आणि स्टीलचा वापर होईल, परंतु त्याचे प्रमाण अत्यंत कमी असेल. लाकडी इमारती वजनाने हलक्या असतात, याचमुळे त्यांचा पाया छोटा असू शकतो अशी माहिती कंपनीच्या प्रमुख एन्निका अनस यांनी दिली आहे. लाकडी घरं स्वस्त असतील, तसेच त्यांच्या निर्मितीवेळी ध्वनी प्रदूषणही कमी होणार आहे. लाकडी इमारतींविषयी सर्वात मोठी चिंता आग लागण्याची आहे. याकरता वुड सिटीच्या इमारतींमध्ये अनेक फायर सेफ्टी सिस्टीम्स लावण्यात येणार आहेत. स्प्रिंकलर आणि फ्लेम रेजिस्टेंट आच्छादन देखील असेल.
इंजिनियर्ड वुड
इंजिनियर्ड वुड म्हणजेच लाकूड मोठ्या प्रमाणात आग रोखणारे आहे. यापूर्वी अमेरिकेत असेंट इमारतीच्या निर्मितीपूर्वी लॅमिनेटेड लाकडाचे परीक्षण केले होते, यात आग प्रतिबंधक असण्याचे रेटिंग मिळाले होते असा दावा संशोधक करतात. या प्रकल्पामळे काँक्रिट अन् स्टीलच्या निर्मितीच्या तुलनेत कार्बन फूटप्रिंट 40 टक्क्यांनी कमी करता येणार आहे. लाकूड टिकाऊ सामग्री असून स्वीडनमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचबरोबर नुतनीकरणीय जंगलांद्वारे त्यांचे उत्पादन केले जाऊ शकते असे कंपनीचे सांगणे आहे.









