‘दिल्ली कॅपिटल्स’-‘मुंबई इंडियन्स’दरम्यान अंतिम सामना, दिल्लीचा भर कर्णधार मेग लॅनिंगवर, मुंबईला हरमनप्रीतच्या फॉर्मची चिंता
वृत्तसंस्था/ मुंबई
पहिल्या महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज रविवारी खेळविला जाणार असून त्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून या स्पर्धेतील आपल्या शानदार वाटचालीचे शिखर गाठण्याची इच्छा मुंबई इंडियन्स संघ बाळगून असेल. मात्र याकामी कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनून राहिलेला आहे.
भारताचे कर्णधारपद भूषविणाऱ्या हरमनप्रीतने या स्पर्धेत सुरुवातीला तीन अर्धशतके नोंदविली होती. मात्र त्यानंतर गमावलेला फॉर्म तिला अजून गवसलेला नसून शुक्रवारी ‘यूपी वॉरियर्स’विऊद्धच्या सामन्यात नॅट सिव्हर-ब्रंटने नाबाद 72 धावा केल्या नसत्या, वेगळे चित्र दिसू शकले असते. हरमनप्रीतला या सामन्यात अवघ्या 14 धावा करता आल्या आणि हे मुंबई इंडियन्ससाठी महागात पडू शकले असते. परंतु सुदैवाने नॅट सिव्हरने मिळालेल्या जीवदानाचा लाभ उठवत यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजीची धार बोथट केली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांचा पाठिंबा फारसा राहणार नसला, तरी ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंग पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करताना हरमनप्रीतच्या खराब फॉर्मचा फायदा उठवू शकते. दिल्ली कॅपिटल्सने सावध सुरुवातीनंतर हळूहळू वाटचाल करत गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचण्यात आणि शेवटी मुंबई इंडियन्सची जागा घेण्यात यश मिळविले, यास फलंदाजीत चमकलेली लॅनिंग आणि अष्टपैलू मॅरिझान कॅप यांची कामगिरी प्रामुख्याने कारणीभूत आहे.
तरीही कुणाचे पारडे जड ठरेल याविषयी भाष्य करणे बरोबर ठरणार नाही. कारण स्पर्धेतील विविध टप्प्यांवर दोन्ही संघांनी तितकेच वर्चस्व गाजवलेले आहे आणि ते तितकेच अयशस्वीही ठरले आहेत. दिल्ली आणि मुंबई यांनी साखळी स्तरावर एकमेकांविऊद्ध जोरदार विजय नोंदवलेले आहेत आणि समान 12 गुणांसह त्यांनी सदर फेरी पूर्ण केली. केवळ धावांच्या सरासरीमुळे त्यांच्या गुणतालिकेतील स्थानात फरक झालेला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम दिल्ली कॅपिटल्सला नऊ गडी राखून पराभूत करून त्यांची ताकद दाखवून दिली. परंतु नंतर दिल्ली कॅपिटल्सने अशाच प्रकारचा दणदणीत विजय मिळवून परतफेड केली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवरील वाटचाल पाहता मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसते. त्यांनी आतापर्यंत येथे झालेले तिन्ही सामने जिंकले आहेत, तर दिल्लीने या ठिकाणी दोन विजय नोंदवले आहेतआणि एक पराभव पत्करला आहे. हरमनप्रीतच्या फॉर्मविषयी चिंता असल्यामुळे नॅट सिव्हर पुढाकार घेऊन या सामन्यात पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शुक्रवारी यूपी वॉरियर्सच्या सर्व गोलंदाजांविरुद्ध तिने तडाखेबंद फलंदाजी केली. अशाच प्रकारची आणखी एक दणदणीत खेळी ती आज खेळू शकली, तर ते मुंबई इंडियन्सला खूप लाभदायक ठरेल.
नॅट सिव्हर सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर (272) असून तिने दोन अर्धशतके झळकावलेली आहेत आणि तिची सरासरी 54.40 अशी आहे. याशिवाय नऊ सामन्यांमध्ये तिने 10 बळी मिळविले असून स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी ती एक ठरली आहे. इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने वेळोवेळी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि दिल्ली कॅपिटल्सला या अंतिम सामन्यात तिच्या फटकेबाजीला रोखणे सोपे जाणार नाही. ‘डब्ल्यूपीएल’मध्ये शेवटच्या पाच षटकांमध्ये नॅट सिव्हर सर्वांत जास्त तडाखेबंद फलंदाज ठरलेली असून यूपी वॉरियर्सला शुक्रवारी रात्री याचा पुरेपूर प्रत्यय आलेला आहे. तिने ‘मुंबई इंडियन्स’ला अंतिम पाच षटकांमध्ये 66 धावा काढण्याच्या बाबतीत मोलाची मदत केली.
मुंबई इंडियन्सची आणखी एक अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यूज (258 धावा आणि नऊ सामन्यांत 13 बळी) ही अलीकडच्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी बजावू शकलेली नसली, तरी संघाचा ती एक महत्त्वाचा भाग असून यस्तिका भाटिया पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न करेल. आणखी दोन बळी मिळाल्यास मुंबईची सायका इशाक (15 बळी) सर्वांत जास्त बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सोफी एक्लेस्टोनला (16) मागे टाकून अग्रक्रमांक मिळवू शकेल. इजाबेल वोंग (13 बळी) आणि अॅमेलिया केर (12 बळी) सारख्या खेळाडू देखील सायकाच्या मागे आहेत. मुंबई इंडियन्सला आज गोलंदाजीत आणखी एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेत अलीकडेच ऑस्ट्रेलियाला विक्रमी पाचव्यांदा ‘टी20’ विश्वचषक जिंकून दिल्यानंतर लॅनिंगची आपल्या खात्यात पहिल्या महिला प्रीमियर लीगचे जेतेपद जमा करण्याची इच्छा निश्चितच असेल. ती स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज असून तिने दोन अर्धशतकांसह 310 धावा (सरासरी 51.66) काढल्या आहेत. दिल्लाच्या कामगिरीत हेलकावे दिसलेले असले, तरी लॅनिंगचे कर्णधारपद, मॅरिझान कॅपची प्रभावी अष्टपैलू कामगिरी (159 धावा आणि आठ सामन्यांत 9 बळी) ही त्यांची मुख्य ताकद आहे. मधल्या षटकांमध्ये अॅलिस कॅप्सीची फटकेबाजी देखील प्रतिस्पर्ध्यांना भरपूर हानी पोहोचवू शकते. दिल्लीचा भर पुन्हा एकदा परदेशी खेळाडूंवर राहणार असला, तरी त्यांना जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, शिखा पांडे आणि राधा यादव यांच्याकडूनही भरपूर अपेक्षा असतील.
संघ : दिल्ली कॅपिटल्स-मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मॅरिझान कॅप, तितास साधू, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अऊंधती रे•ाr, अपर्णा मंडल.
मुंबई इंडियन्स-हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सिव्हर-ब्रंट, अॅमेलिया केर, पूजा वस्त्रकार, यास्तिका भाटिया, हेदर ग्रॅहम, इजाबेल वोंग, अमनज्योत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, कोमल झांजड, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिश्त, जिंतामणी कलिता.
वेळ : सायंकाळी 7.30 वा.









