देवदत्त पडिक्कलचे दीडशतक, पावसामुळे खेळ वाया
वृत्तसंस्था / लखनौ (उत्तरप्रदेश)
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिली अनधिकृत चार दिवसांची कसोटी शुक्रवारी अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आली. पावसामुळे शेवटच्या दिवशीचा बराच खेळ वाया गेला. देवदत्त पडिक्कलने शानदार दीडशतक झळकविले.
उभय संघात दोन सामन्यांची ही अनधिकृत कसोटी मालिका खेळविली जात आहे. या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया अ ने पहिला डाव 6 बाद 532 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारत अ संघाने चोख प्रत्युत्तर देताना आपला पहिला डाव 7 बाद 531 धावांवर घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ ने दुसऱ्या डावात 16 षटकात बिनबाद 56 धावा जमविल्या.
ऑस्ट्रेलिया अ च्या पहिल्या डावात सलामीचा कोन्स्टास आणि जोश फिलीप यांनी दमदार शतके झळकविली. केलावे, कोनोली आणि स्कॉट यांनी अर्धशतके नोंदविली. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 98 षटकात 6 बाद 532 धावांवर घोषित केला. हर्ष दुबेने 3 तर ब्रारने 2 व खलिल अहमदने 1 गडी बाद केला.
भारत अ संघाने आपल्या पहिल्या डावाला दमदार सुरूवात केली. 4 बाद 403 या धावसंख्येवरुन भारत अ ने आपल्या पहिल्या डावाला शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 141.1 षटकात 7 बाद 531 धावांवर डावाची घोषणा केली. देवदत्त पडिक्कलने दमदार फलंदाजी करत 281 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह 150 धावा झळकविल्या. ध्रुव जुरेलने 197 चेंडूत 5 षटकार आणि 13 चौकारांसह 140 धावा जमविल्या. जगदीशन आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके नोंदविली. जगदीशनने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 64 तर साई सुदर्शनने 10 चौकारांसह 73 धावा जमविल्या.
चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाला त्यावेळी पडिक्कल 86 तर जुरेल 113 धावांवर खेळत होते. मात्र जुरेलने आणखी 27 धावांची भर घातल्यानंतर ओनीलने त्याला झेलबाद केले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 228 धावांची द्विशतकी भागिदारी केली. पडिक्कलने 198 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तनुष कोटियनने 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. देवदत्त पडिक्कल रॉचीसिओलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दुबेने 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 16 धावा केल्या. भारत अ संघाने 141.1 षटकात 7 बाद 531 धावांवर डावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियातर्फे रॉचीसिओलीने 169 धावांत 3 तर ओनील, बार्टलेट, स्कॉट, कोनोली यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. ऑस्ट्रेलिया अ ने पहिल्या डावात केवळ एका धावेची नाममात्र आघाडी घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात 16 षटकात बिनबाद 56 धावा जमविल्या असताना पावसाला प्रारंभ झाला. पावसाने विश्रांती न घेतल्याने पंचांनी शेवटच्या दिवशीचा खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. कोन्स्टासने 3 चौकारांसह नाबाद 27 तर केलावेने 3 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. आता या मालिकेतील दुसरा सामना लखनौमध्ये 23 सप्टेंबरपासून खेळविला जाईल.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया अ प. डाव 98 षटकात 6 बाद 532 डाव घोषित (कोन्स्टास 109, केलावे 88, कोनोली 70, स्कॉट 81, फिलीप नाबाद 123, बार्टलेट नाबाद 39, हर्ष दुबे 3-141, ब्रार 2-87, खलील अहमद 1-80), भारत अ प. डाव 141.1 षटकात 7 बाद 531 डाव घोषित (देवदत्त पडिक्कल 150, ध्रुव जुरेल 140, जगदीशन 64, सुदर्शन 73, ईश्वरन 44, कोटियन 16, दुबे नाबाद 16, अवांतर 20, रोचीसिओली 3-159, ओनील, बार्टलेट, स्कॉट, कोनोली प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया अ दु. डाव 16 षटकात बिनबाद 56 (कोन्स्टास नाबाद 27, केलावे नाबाद 24).









