जगातील सर्वात उंच आर्च ब्रिज : 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप पेलण्याची क्षमता
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिह्यात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पुलावरून स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी पहिली टेन धावेल. सांगलदन ते रियासी दरम्यान धावणारी ही रेल्वे सेवा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा भाग आहे. अतिशय भक्कम स्थितीत उभारण्यात आलेला हा पूल 40 किलोपर्यंतची स्फोटके आणि 8 रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. पाकिस्तानी सीमेपासून त्याचे हवाई अंतर केवळ 65 किमी आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर काश्मीर खोरे भारताच्या इतर भागांशी प्रत्येक मोसमात रेल्वेगाड्यांद्वारे जोडले जाईल.
20 जून रोजी या पुलावर टेनची ट्रायल रन झाली. यापूर्वी 16 जून रोजी या पुलावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे, तर चिनाब नदीवर बांधण्यात आलेला 1.3 किमी लांबीचा हा पूल 359 मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे.
काश्मीर खोऱ्यात कोणत्याही त्र+तूमध्ये पोहोचण्यासाठी भारत सरकारने 35,000 कोटी ऊपये खर्चून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबीआरएल) प्रकल्प सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत हा पूल बांधण्यात आला आहे. केंद्र सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम सुरू केले होते. ‘युएसबीआरएल’ प्रकल्प 1997 मध्ये सुरू झाला. याअंतर्गत 272 किमीचा रेल्वेमार्ग टाकण्यात येणार होता. आतापर्यंत विविध टप्प्यांत 209 किमी इतका मार्ग पूर्ण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस रियासी ते कटरा यांना जोडणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गानंतर प्रवाशांना जम्मूमधील रियासी ते काश्मीरमधील बारामुल्ला असा प्रवास करता येईल. तसेच रियासीला श्री माता वैष्णोदेवी कटरा स्थानकाशी जोडणारा 17 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग निर्माण झाल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेप्रवास करणे सोपे ठरणार आहे.
पूल पूर्ण होण्यासाठी 20 वर्षांचा अवधी
स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होऊनही काश्मीर खोरे बर्फवृष्टीच्या काळात देशाच्या इतर भागांपासून विभक्त राहत होते. 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत, काश्मीर खोऱ्यात फक्त राष्ट्रीय महामार्ग- 44 द्वारे पोहोचता येत होते. काश्मीर खोऱ्याकडे जाणारा हा रस्ताही बर्फवृष्टीमुळे बंद असायचा. 2003 मध्ये भारत सरकारने सर्व हवामान आधारावर काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी चिनाब पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच वषी सरकारने चिनाब ब्रिज प्रकल्पालाही मान्यता दिली. हा पूल 2009 पर्यंत तयार होणार होता. मात्र, त्याला बराच विलंब झाला. आता जवळपास 2 दशकांनंतर चिनाब नदीवर बांधलेला हा पूल सज्ज झाला आहे.
भूकंप-स्फोटकांपासून पूर्णपणे सुरक्षित
चिनाब पुलाचा टिकाऊपणा पुढील किमान 120 वर्षांपर्यंत भक्कम राहील असा दावा करण्यात आला आहे. जगातील सर्वात उंच असलेला हा पूल भूकंप, पूर, बर्फवृष्टी आणि स्फोटकांपासून सुरक्षित राहील असा खास तयार करण्यात आला आहे. पुलाचे क्षेत्र भूकंप झोन-4 मध्ये येत असले तरी ते भूकंप झोन-5 साठी डिझाईन केले गेले आहे. म्हणजेच तो भूकंपांपासून पूर्णपणे सुरक्षित असल्याने 8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचाही सहज सामना करू शकतो.









