वृत्तसंसथा /नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अव्वल तीन स्थाने पटकावली आहेत. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात 163 धावा करणारा ट्रॅव्हिस हेड (884 रेटिंग गुण) हा तीन स्थानांची झेप घेत मार्नस लाबुशेन (पहिला क्रमांक-903 रेटिंग गुण) आणि स्टीव्ह स्मिथ (दुसरा क्रमांक-885 रेटिंग गुण) यांना येऊन मिळाला आहे. 39 वर्षांपूर्वी डिसेंबर, 1984 मध्ये एकाच संघाच्या तीन फलंदाजांनी कसोटी क्रमवारीतील पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज (810 गुण), क्लाइव्ह लॉईड (787 गुण) आणि लॅरी गोम्स (773 गुण) यांनी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले होते. याशिवाय उस्मान ख्वाजा 777 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत 9 व्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या दहा खेळाडूंमध्ये चार ऑस्ट्रेलियन आहेत. फलंदाजांमध्ये भारताच्या पुनरागमन केलेल्या अजिंक्य रहाणेला 37 वे, तर शार्दुल ठाकूरला 94 वे स्थान प्राप्त झालेले आहे. कार अपघातातून सावरणारा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा भारतीयांमध्ये क्रमवारीत सर्वोच्च म्हणजे 10 व्या क्रमांकावर कायम आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या स्थानावर स्थिर आहेत. अनुभवी ऑफ-स्पिनर आर. अश्विन जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत झळकलेला नसला, तरी त्याने कसोटी गोलंदाजांमधील अग्रस्थान कायम राखले आहे, तर सहकारी फिरकीपटू रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर आहे. तथापि, जुलै, 2022 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळलेला आणि दुखापतींनी ग्रासलेला जसप्रीत बुमराह दोन स्थानांनी घसरून आठव्या स्थानावर आला आहे.









