वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील गुवाहाटी हे प्रमुख शहर असून या ठिकाणी पहिल्यांदाच क्रिकेट कसोटी सामना आयोजित केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना गुवाहाटीमध्ये आयोजित केला असून या सामन्यासाठी आतापासूनच जोरदार पूर्व तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे चालू वर्षाच्या अखेरीस महिलांची आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे यजमानपद गुवाहाटी भूषविणार आहे. आतापर्यंत गुवाहाटीमध्ये एकही कसोटी तसेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने खेळले गेलेले नाहीत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून आसाम क्रिकेट संघटेनच्या नव्याने बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाईल, असे बीसीसीआयचे सरचिटणीस देवजीत सायकिया यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील किमान 5 ते 6 सामने आसाम क्रिकेट संघटनेच्या या स्टेडियमवर होणार आहेत.









