विजयासाठी 277 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 4 बाद 99,
लंडन / वृत्तसंस्था
येथील प्रतिष्ठेच्या लॉर्ड्स कसोटी मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचे आव्हान असून तिसऱया दिवशी चहापानाअखेर त्यांनी 4 बाद 99 धावांपर्यंत मजल मारली होती.
शनिवारी न्यूझीलंडने 4 बाद 236 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, त्यांचे उर्वरित 6 फलंदाज अवघ्या 49 धावांमध्येच बाद झाले आणि यानंतर इंग्लंडसमोर दुसऱया डावात विजयासाठी 277 धावांचे आव्हान असेल, हे सुस्पष्ट झाले.
नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडने या लढतीत पूर्ण वरचष्मा गाजवला. पहिल्या 90 मिनिटांच्या खेळात न्यूझीलंडला केवळ 34 धावा करता आल्या. डॅरेल मिशेल व ब्लंडेल यांची 180 धावांची भागीदारी संपुष्टात आणली गेली आणि तेथून किवीज डावाला ब्रेक लागला. त्यापूर्वी, मिशेलने दिवसभरातील पहिल्या चेंडूवर शतक साजरे केले. तो लॉर्ड्सवर शतक झळकावणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 132, इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 141. न्यूझीलंड दुसरा डाव सर्वबाद 285 (डॅरेल मिशेल 203 चेंडूत 108, टॉम ब्लंडेल 198 चेंडूत 96, ब्रॉड 3-76, पॉट्स 3-55, अँडरसन 2-57), इंग्लंड दुसरा डाव (टार्गेट 277) ः 34 षटकात 4 बाद 99 (स्टोक्स 54. काईल जेमिसन 3-50).