रत्नागिरी :
दिवसागणिक वाढत्या तापमानाने जिह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यावर्षी पहिलाच टँकर हा रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. तालुक्यातील सोमेश्वर या गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यात काही गावांकडून पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू झाली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी लांजा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला टँकर धावला होता. सध्या उष्णतेत झालेल्या वाढीमुळे सर्वत्र होरपळ सुरू झाली आहे. कडक उन्हामुळे भूजल पातळीही खालावण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिह्यातील पाणीटंचाईला प्रारंभ झाला आहे. या पाणीटंचाईचा पहिला टँकर रत्नागिरी तालुक्यातच धावू लागला आहे. रत्नागिरीनजीकच्या सोमेश्वर या गावात प्रशासन स्तरावरून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
यावर्षी जिह्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला नुकतीच मंजुरी प्रशासन स्तरावरून देण्यात आली आहे. तब्बल 357 गावांतील 722 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी 9 कोटी 49 लाख 70 हजार ऊपयांची आवश्यकता आहे. यावर्षी संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड आणि रत्नागिरी या तालुक्यांना सर्वाधिक पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाई पाचवीला पूजलेली असल्याचे बोलले जात आहे. टंचाई निवारणासाठी दरवर्षी अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत. पण भौगोलिक परिस्थितीचे कारण टंचाईप्रश्नी पुढे केले जात आहे. पाणी साठवण्यासाठी शासकीय तसेच जनतेचे प्रयत्नही अपुरे पडत आहेत. यावर्षी पाऊस लांबल्याने पाणीटंचाईला थोडी उशिराने सुरूवात झाली असल्याचे सांगण्यात आले.








