आयएसएमसीसोबत राज्य सरकारचा करार
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशातील पहिला महत्त्वकांक्षी सेमीकंडक्टर प्लांट बेंगळुरात उभारण्यात येत आहे. त्यानुसार राज्य सरकारने आयएसएमसी अनलॉग फॅब प्रा. लिमिटेडशी करार केला असून रविवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. एकूण 22,900 कोटी (3 बिलियन) रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सात वर्षाच्या कालावधीत एकूण 1,500 जणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारतर्फे उद्योग खात्याचे अप्पर मुख्य कार्यदर्शी डॉ. ई. व्ही रमणरेड्डी आणि आयएसएमसीतर्फे सचिव अजय जलन यांनी करारावर स्वाक्षरी केली.
सेमीकंडक्टर प्लांट उभारणी संबंधित कर्नाटक सरकार आणि आयएसएमसी अनलॉग फॅब प्रा. लिमिटेड संस्थेशी झालेल्या परस्पर करारामुळे जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर कर्नाटकची ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले. सेमीकंडक्टर फॅब गुंतवणूक करण्यासाठी विविध राज्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना कर्नाटक सरकारने या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली आहे.
केवळ अर्थिक प्रोत्साहन न देता व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे वातावरण निमार्ण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. याची जाणीव कर्नाटक सरकारला असून देशात सर्वोत्तम पायाभूत आणि कुशल मनुष्यबळ राज्यात आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात हे एक मोठे पाऊल आहे. याचबरोबर अनेक आव्हानेदेखील मोठय़ा प्रमाणात आहेत. या आव्हानांना सामारे जाण्यासाठी या करारातून एक संधी मिळाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपले लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत सरकारचे सेमीकंडक्टर मिशनला अनुमोदन मिळाले असल्याने सेमीकंडक्टर क्षेत्रात कर्नाटक सरकार उच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या करारामुळे इस्रायल आणि भारत यांच्यातील तंत्रज्ञान व संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा टप्पा निश्चित होईल, असेही बोम्माई म्हणाले.
यावेळी उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान कार्यदर्शी मंजुनाथ प्रसाद, आयटीबीटी सचिव मीना नागराज, उद्योग खात्याच्या आयुक्ता गुंजन कृष्णा, इस्रायलचे भारतातील राजदूत नावर गिलोन, आयएसएमसी प्रमुख इरेज इंबरमन यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.









