रत्नागिरी :
कोकणातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला जिह्यात भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. मंगळवारपासून गाववस्त्यांतील मांडावर होळ्यांचे विधीवत पूजन आणि पहिला होम केला जाणार आहे. त्यानंतर गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजवून ग्रामदेवतांना ऊपे लावण्यात येणार असून जिह्यात 1,399 पालख्या सजणार आहेत. जिल्ह्dयात 1,315 ठिकाणी सार्वजनिक तर 2,854 खासगी होळ्या उभारण्यास प्रारंभ झाला आहे.
मंगळवारी फाक पंचमीपासून कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करून शिमगोत्सवाची सुरुवात होते. आठ दिवस हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यापमाणे 4 मार्च फाल्गुन पंचमी (फाक पंचमी) पासून या जल्लोषी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. आठ दिवसांनी होळ्यांचा होम झाल्यानंतर ग्रामदेवतांच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. अनेक ठिकाणी ग्रमदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवाच्या दिवशी होळ्या घेण्यासाठी मंदिराबाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी तर पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो.
- चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होणार
नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहेत. त्यांच्याकरीता रेल्वेकडून होळी स्पेशल गाड्या तर राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. चाकरमानी दाखल झाल्यानंतर गावागावात शिमगोत्सवाचा उत्साह आणखीन वाढणार आहे.








