अग्निपथ योजना : 1 वर्षात बटालियनमध्ये दिसणार ‘अग्निवीर’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सरकारने सैन्यात नवी व्यवस्था लागू केली असून याच्या अंतर्गत प्रथम 4 वर्षांसाठी युवक-युवतींची सैन्यात भरती केली जाणार आहे. त्यानंतर यातील 25 टक्के सैनिकांना कामगिरीच्या आधारावर सैन्यात कायम ठेवण्याबद्दल विचार केला जाणार आहे. या योजनेला अग्निपथ नाव देण्यात आले आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत कालबद्ध पद्धतीने भरती केली जाणार आहे. पहिल्या वर्षी 40 हजार सैनिकांची भरती होईल. पुढील 90 दिवसांमध्ये पहिल्या भरती रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. सुमारे 180 दिवसांच्या आत नवे सैनिक 6 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी तयार होतील. तर वर्षभरात अग्निवीरांची पहिली तुकडी बटालियनमध्ये सामील होऊ शकेल अशी माहिती लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू यांनी दिली आहे.

या योजनेमुळे सैन्याला अधिक तरुण सैनिक मिळू शकतील. तसेच हे तंत्रज्ञानाप्रकरणी अधिक निपुण असतील. सैन्यात सध्या सैनिकांचे सरासरी वय 32-33 वर्षे आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत 8-10 वर्षांमध्ये हे सरासरी वय कमी होत 26 वर्षांनजीक येणार असल्याने सैन्य पूर्वीपेक्षा अधिक फिट राहणार आहे. यामुळे अवघड भागांमध्ये अधिक आव्हानात्मक स्थितीत काम करण्याची सैन्याची क्षमता वाढणार आहे. याचबरोबर सैन्य पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात तंत्रज्ञानस्नेही म्हणून सक्षम होऊ शकणार असल्याचे राजू यांनी म्हटले आहे.
तंत्रज्ञान कौशल्यात प्रशिक्षित असलेल्या युवक-युवतींची भारतीय सैन्याला गरज आहे. यासाठी आम्ही आयटीआय, पॉलिटेक्निकमधून प्रतिभाशाली युवक-युवतींना सैन्यात संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे सैन्यात सामील केल्यावर त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज भासणार नसल्याचे राजू यांनी सांगितले आहे.
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत देशभरातून युवक-युवतींची भरती केली जाणार आहे. त्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यावर 3.5 वर्षे सेवा बजवावी लागणार आहे. 4 वर्षे पूर्ण झाल्यावर सैन्यात राहण्यास पात्र तसेच दृष्टीकोन असलेल्या 25 टक्के युवक-युवतींना सैन्यात कायम ठेवण्यासंबंधी विचार करणार आहोत. अशाप्रकारे आम्ही स्वतःला भविष्यातील लढाईंसाठी अधिक उत्तमप्रकारे सज्ज करू शकू असे उद्गार लेफ्टनंट जनरल राजू यांनी काढले आहेत.
‘अग्निवीरां’ना भरतीत प्राथमिकता
भूदल, नौदल अन् वायुदलात विशेष ‘अग्निपथ’ योजनेच्या अंतर्गत भरती होणाऱया ‘अग्निवीर’ सैनिकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीत प्राथमिकता मिळणार आहे. यासंबंधीची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी केली आहे.
योजनेच्या अंतर्गत 4 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱया सैनिकांना भरती प्रक्रियेत प्राथमिकता दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे. ‘अग्निपथ’ योजना देशाच्या तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक दूरदर्शी आणि स्वागतयोग्य पाऊल असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटले आहे.









