‘सोलमेट्स व्हेट हॉस्पिटल’चे उद्या होणार उद्घाटन
बेळगाव : बेळगाव शहरात पहिल्यांदाच पाळीव प्राण्यांसाठी खासगी सुसज्ज हॉस्पिटल सुरू होत आहे. अयोध्यानगर येथे ‘सोलमेट्स व्हेट हॉस्पिटल’ सुरू होत असून यामुळे प्राणीप्रेमींना आता पाळीव प्राण्यांवर अत्याधुनिक उपचार करता येणार आहे. या पाळीव प्राण्यांसाठीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती सोल प्रायव्हेट लि. च्या सीईओ डॉ. विजयालक्ष्मी कुलगोड यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्र पहिल्यांदाच पाळीव प्राण्यांसाठीचे सुसज्ज खासगी हॉस्पिटल सुरू होत आहे. याठिकाणी प्राण्यांच्या तपासणीसोबतच लसीकरण,
ऑपरेशन अशा विविध सेवा दिल्या जाणार आहेत. हॉस्पिटलने मुंबई, दिल्ली येथील तज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे. हॉस्पिटलमध्ये एक्सरे, अल्ट्रा साऊंड व ब्लड टेस्ट अशा विविध सेवा दिल्या जाणार आहेत. यापूर्वी पाळीव प्राण्यांवर सरकारी पशू वैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचार करावे लागत होते. पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उपचार घेताना अनेक अडथळे येतात. हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी वरिष्ठ पशुवैद्यकीय सर्जन डॉ. जी. पंपापथी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पशुवैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. राजीव कुलेर, डॉ. शशीधर नाडगौडा यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. शशीकांत कुलगोड यांनी दिली. डॉ. अनिलकुमार जानी, हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका रुपा तळवार यासह इतर उपस्थित होते.









