प्रथम भाषा पेपरला 515 विद्यार्थ्यांची दांडी : पोलिसांचा चोख बंदोबस्त
बेळगाव : महिन्याभरापासून हुरहुर लागलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. दहावीचे गुण उच्चशिक्षणासाठी महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांची जोरदार तयारी होती. शुक्रवारी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड होती. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे प्रश्नपत्रिकांची वाहतूक करण्यात आली. वेळेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आल्या. ज्या परीक्षा केंद्रांवर कंपाऊंड नाहीत, अशा ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच भरारी पथके परीक्षा केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या हालचाली टिपत होती.
वेबकास्टिंगमुळे कॉपीला आळा
कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्हींचे वेबकास्टिंग थेट बेंगळूर येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयात होत आहे. तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा केली आहे. त्यामुळे कॉपीच्या प्रकारांना पूर्णत: आळा बसला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीचा पेपर सुरळीत पार पडला.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 515 विद्यार्थी गैरहजर
दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी झालेल्या प्रथम भाषा पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 515 विद्यार्थी गैरहजर होते. 33 हजार 012 विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा पेपरसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 32 हजार 497 विद्यार्थी उपस्थित होते. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा मराठी, कन्नड माध्यमाचा विद्यार्थ्यांचा कन्नड, इंग्रजी माध्यमाचा इंग्रजी तर ऊर्दू माध्यमाचा ऊर्दू पेपर घेण्यात आला.









