कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला मंगळवारपासून ताण-तणाव, दडपण अन काहीसा उत्साह अशा संमिश्र वातावरणा सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी परीक्षेपूर्वी काहीसे तणावात होते. मात्र, परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना काहींना पेपर आवघड गेला तर काहींना पेपर सोपा गेला, पण थोडा आणखी वेळ हवा होता अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. पहिला पेपर सुरळीत पार पडल्याचा रिपोर्ट कोल्हापूर विभागीय मंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पाठवला आहे. एकही कॉपीच्या गैरप्रकाराची नोंद नाही, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रावर 49 हजार 814 विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर दिला. बैठक व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांनी आधीच घेतल्याने विद्यार्थी सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रांवर येण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांसोबत पालकही आले होते. त्यामुळे केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोल्हापूर शहरातील विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, कमला कॉलेज, कॉमर्स कॉलेज यासह विविध परीक्षा केंद्रांवर व केंद्राबाहेर विद्यार्थी व पालकांची गर्दी होती. साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले. धाक-धुक आणि तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला. परंतू पेपर सुटल्यानंतर सोपा पेपर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. तर पेपर अवघड गेलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यासाठी वेळ न मिळाल्याचे सांगितले. पुणे विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षेचा दैनंदिन रिपोर्ट घ्यायचे बंद केल्याने शेवटचा पेपर संपल्यानंतरच हजेरी रिपोर्ट ऑनलाईन सबमीट केला जाणार आहे. कोल्हापूर विभागांतर्गत बारावी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 7 भरारी पथकांची नियुक्ती केली होती. परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू केल्याने परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद होते. परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यापुर्वी तपासणी केली जात होती. परीक्षेच्या पहिल्या दिवशी पालकांनी परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी केली होती. आपआपल्या मित्र-मैत्रिणींना बेस्ट ऑफ लक देत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश केला. सकाळी 11 वाजता पेपर सुरू झाला तर दुपारी 2.10 वाजता पेपर सुटला. विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, पेपर सोपा गेलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर पेपर आवघड गेलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. आज (दि. 12) हिंदीचा पेपर होणार आहे.

- कॉपी न करण्याची शपथ कमला कॉलेजमध्ये
परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजता आलेल्या विद्यार्थ्यांकडून कॉपी न करण्याची शपथ घेण्यात आली. त्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले. शैक्षणिक करिअरला महत्त्वाचे वळण देणारी ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ताण-तणाव, दडपण दिसत होते.
- कॉपीमुक्तीसाठी कडक नियमावली
परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बोर्डाने कडक नियमावली तयार केली आहे. या निमयवालाची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सर्वच केंद्रांवर दिसून आले. मोबाईलसह इतर कोणत्याच वस्तू परीक्षा हॉलमध्ये घेवून येण्यास बंदी होती. पेपर सोडवण्यासाठी ट्रान्फर पॅडला परवानगी दिली. परंतू इतर पॅड घेवून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉलच्या बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र व परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले.
- इंग्रजीचा पेपर सोपा गेला
बारावी परीक्षेसाठी वर्षभर खूप अभ्यास केला आहे. इंग्रजीचा पहिला पेपर सोपा गेला. मला मेडीकलला प्रवेश घ्यायचा आहे, त्यामुळे पुढील पेपरचे दडपण असले तरी मी अभ्यास करून परीक्षा देत असल्याने पाहिजे तेवढी भिती वाटत नाही.
रामेश्वरी शिंदे (विद्यार्थीनी)
- पेपर सोपा होता
विमला गोयंकाने माझा अर्जच भरला नव्हता. रविवारी सकाळी अर्ज भरून संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट मिळाले. या गोंधळा प्रचंड ताण आला होता. तरीही ध्येय गाठण्यासाठी परीक्षेला सोमोरे जाण्याचा निर्णय घेतला. पहिला इंग्रजीचा पेपर सोपा गेला आहे. एप्रिलमधे होणारी जेईई परीक्षा देवून इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे. इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी तयारी करीत आहे.
आर्यन देसाई (विद्यार्थी)








