भारत जोडो यात्रेसमवेत अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक शनिवारी हैदरबाद येथे होणार असून यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीति, विरोधी पक्षांच्या आघाडीची एकजुटता, विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी आणि अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसने 20 ऑगस्ट रोजी स्वत:च्या कार्यकारिणी समितीची पुनर्रचना केली होती. या समितीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी तसेच अनेक वरिष्ठ नेते सामील आहेत.
कार्यकारिणी समितीत 39 सदस्य, 32 स्थायी आमंत्रित सदस्य आणि 13 विशेष आमंत्रित सदस्य सामील करण्यात आले आहेत. या कार्यकारिणी समितीत सचिन पायलट आणि शशी थरूर यासारख्या नेत्यांना पहिल्यांदाच स्थान देण्यात आले आहे.
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा
काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी होणार आहे. तर विस्तारित कार्यसमितीची बैठक रविवारी होणार आहे. विस्तारित कार्यसमितीच्या बैठकीत कार्यकारिणी सदस्यांसोबत प्रदेशाध्यक्ष तसेच अनेक अन्य वरिष्ठ नेते भाग घेणार आहेत. यानंतर 17 सप्टेंबर रोजी हैदराबादनजीक एक जाहीर सभा होणार असून याला पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्याची रणनीति, विरोधी पक्षांच्या एकजुटतेला भक्कम करणे, संघटनेला मजबूत करणे इत्यादी विषयांवर चर्चा होईल. तसेच ‘भारत जोडो यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्यावरूनही या कार्यकारिणी समितीत चर्चा होणार आहे.
जागावाटपावर चर्चा होणार
कार्यकारिणी समितीची बैठक, जाहीर सभा अन् मोर्चाद्वारे काँग्रेस तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या प्रचारमोहिमेला वेग देणार आहे. राज्यात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेसने 24 हून अधिक पक्षांसोबत मिळून ‘इंडिया’ नावाने आघाडी स्थापन केली असून या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नव्या कार्यकारिणी समितीची बैठक पार पडणार आहे. पुढील लोकसभा निवडणूक एकत्र येत लढविण्याचा निर्णय आणि त्यादृष्टीकोनातून जागावाटप करण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. यामुळे काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत संभाव्य जागावाटपाचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो.
सरकारला घेरण्याची रणनीति
काही महिन्यांनी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरून कार्यकारिणी समितीत मंथन होणार आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:ची दावेदारी मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैटकीत महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, चीनसोबतच्या सीमेवरील तणाव, कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या रणनीतिवरही चर्चा होऊ शकते.









