सरसंघचालकांसह अमित शहा, जे. पी. नड्डा उपस्थित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे साकारण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्याधुनिक कार्यालयातील प्रथम सभा बुधवारी उत्साहात पार पडली आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा हे नेतेही उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थान सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वीकारले होते. संघाचे राष्ट्रीय महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ही सभा ‘कार्यकर्ता संमेलना’च्या स्वरुपातील होती.
देशातील निवडक स्वयंसेवकांना या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते या संमेलनाला उपस्थित होते. ही नव्या कार्यालयातील प्रथम सभा होती. या कार्यक्रमात अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दीपूर्ती कार्यक्रम होणार आहे. या संघटनेची स्थापना 1925 मध्ये झाली होती.
भव्य वास्तू, आधुनिक सुविधा
संघाचे हे दिल्लीतील कार्यालय 3.75 एकर जागेवर साकारण्यात आले असून त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च आला आहे. हा खर्च संघ स्वयंसेवक आणि संघ समर्थक अशा 75 हजार व्यक्तींच्या आर्थिक योगदानातून करण्यात आला आहे. गेली आठ वर्षे या कार्यालयाचे निर्माण कार्य चालले होते. कार्यालय परिसरात तीन 12 मजली मनोरे साकारण्यात आले असून येथे टप्प्याटप्प्याने संघाच्या दिल्लीतील जुन्या कार्यालयातील साधनसामग्री आणि कागदपत्रे हलविण्यात येत आहेत.
मनोऱ्यांची अभिनव नावे
या कार्यालय परिसरातील तीन मुख्य मनोऱ्यांची नावे साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी ठेवण्यात आली आहेत. परिसरात दोन समागृहे असून त्यांच्यापैकी सर्वात मोठ्या सभागृहाला विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनाचे आद्य नेते अशोक सिंघल यांचे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील संघाच्या जुन्या कार्यालयाजवळच हे नवे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे.
300 कक्ष, 12 मजले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यालयात 300 कक्ष (खोल्या) असून प्रत्येक मनोऱ्याची रचना तळमजला अधिक 12 मजले अशी आहे. या कार्यालयाची वास्तूरचना पारंपरिक वास्तू रचना शैली आणि अत्याधुनिकता यांचा संगम आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या कार्यलयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. देशभर या संघटनेचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीही या कार्यालयात सोयी-सुविधा आहेत. कार्यकर्त्यांसाठी एक 5 खाटांचे सुसज्ज रुग्णालय, पाण्याच्या पुनउ&पयोगासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौरऊर्जानिर्मितीची व्यवस्था आणि इतर पर्यावरणस्नेही साधने संस्थापित करण्यात आली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.









