बंगाल-ओडिशामध्ये अतिवृष्टीचा इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2022 या वर्षातील पहिले चक्रीवादळ असानी 10 मे रोजी भारताच्या किनारी क्षेत्रांमध्ये धडकू शकते. हवामान विभागाने बंगाल आणि ओडिशाच्या 4 जिल्हय़ांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. चक्रीवादळामुळे 90 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात, असे विभागाने म्हटले आहे.
अंदमान सागरातून असानी चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकले आहे. 8 मे पासून बंगाल, ओडिशा आणि झारखंडच्या अनेक जिल्हय़ांमध्ये पाऊस पडणार आहे. चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्रच्या किनारी क्षेत्राला धडकू शकते. त्यादरम्यान वाऱयाचा वेग 75 ते 90 किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे.
मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
एनडीआरएफ आणि ओडीआरएएफच्या पथकांना तैनात केले जाणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या सूचनेनंतर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारी केली असल्याचे ओडिशा स्पेशल रिलिफ आयुक्त पी. के. जेना यांनी सांगितले.
या राज्यांवर दिसणार प्रभाव
चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशासह पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्रप्रदेश, झारखंड, ईशान्येतील अनेक राज्यांमध्ये दिसून येऊ शकतो. हवामान विभागाने ओडिशासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. भारतात यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये जावद चक्रीवादळ धडकले होते. तर सप्टेंबर 2021 मध्ये गुलाब चक्रीवादळ दाखल झाले होते. तर मे 2021 मध्ये यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसमवेत काही राज्यांमध्ये मोठे नुकसान घडवून आणले होते.









