कोल्हापूर / इम्रान गवंडी :
कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावात नव्याने होणाऱ्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रूग्णालय तयार होण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुमारे दीड कोटी रूपयांची ई–निविदा भरण्याची प्रकिया सुरू झाली आहे. साधारणत: दोन वर्षात हे होमिओपॅथिक महाविद्यालय उभे राहणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील पहिले होमिओपॅथिक महाविद्यालय कागल येथे साकारत असल्याने याचा निश्चितच गरीब व गरजु विद्यार्थ्यांसह रूग्णांना लाभ होणार आहे. यामध्ये 100 विद्यार्थीं क्षमतेचे शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व 50 खाटांचे रूग्णालयासह इतर बांधकाम केले जाणार आहे. लवकरच हे महाविद्यालय व रूग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असुन वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतीकारक पाऊलच म्हणावे लागेल. पिंपळगाव आणि आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याठिकाणी हजारोंचे उपचार मोफत व माफक दरात केले जाणार आहेत.
कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे प्रस्तावित शासकीय महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची कामगिरी करणार आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षण व रूग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. 100 विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी दिली.
महाविद्यालयाच्या बांधकाम, पायाभूत सुविधा, आणि इतर आवश्यक बाबींसाठी इमारत बांधकाम, वर्गखोल्या, सर्जरी विभागा, ग्रंथालय, विविध आजारांची स्वतंत्र ओपीडी आणि प्रशासकीय कार्यालये यांचा समावेश आहे. निविदेमध्ये बांधकामाची गुणवत्ता, कालमर्यादा, आणि खर्चाचा तपशील नमूद केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर निवडलेल्या कंत्राटदाराला ठराविक कालावधीत बांधकाम पूर्ण करावे लागेल. निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविली जाणार आहे.
- गरीब व गरजूंना लाभ
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात पहिले व राज्यात दुसरे होमिओपॅथिक महाविद्यालय व रूग्णालय कागल तालुक्यात साकारत आहे. होमिओपॅथिक स्त्रीरोग, बालरोग, पॅरेलेसिस, हाडांचे उपचारावर प्रभावी काम करते. याचा खासगी हॉस्पिटलमध्ये खर्च न परवडणारा आहे. मात्र, हे रूग्णालय गरीब व गरजुंना लाभदायक ठरणार आहे.
- होमिओपॅथिक रूग्णालयातील सुविधा :
-100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालयाची इमारत
-50 खाटांचे प्रशस्त रूग्णलयाची इमारत
–प्रशस्त मेडिसीन विभाग
–बालरोग विभाग
–अत्याधुनिक सर्जरी विभाग
–स्त्रीरोग विभाग
–जिल्ह्यातील रूग्णांना माफक दरात उपचार
–गरीब व गरजुंना लाभ








