वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, अमृतसर
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची ‘घरवापसी’ सुरू झाली आहे. बुधवारी 104 भारतीय अमृतसर विमानतळावर पोहोचले. यातील बहुतेक लोक पंजाबमधील आहेत. विमानातील एकूण प्रवाशांमध्ये 79 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश होता. यामध्ये 13 मुलांचाही समावेश असल्याचे विमानतळावर उपस्थित असलेल्या अमेरिकन दूतावासाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात पोहोचले आहे. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकन सी-147 विमानाने भारतात पोहोचली. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची ही पहिलीच हद्दपारी आहे. बुधवारी दुपारी दुपारी 1.59 वाजता सदर विमान अमृतसर विमानतळावर उतरले. तत्पूर्वी, अमेरिकन लष्करी विमान सी-17 ने टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून उ•ाण केले होते. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध मोहीम सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या बहुतेक लोकांना अमेरिका-मेक्सिको सीमेवर पकडण्यात आले होते. तथापि, हे लोक भारतात गुन्हेगार नाहीत. या लोकांनी देश सोडण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारला. तथापि, त्यांनी अवैध मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अंदाजानुसार, अमेरिकेत सुमारे 18,000 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित असून त्यांना भारतात पाठवण्याची आवश्यकता आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर भारत सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांची समस्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती.
कोणत्या राज्यातील किती लोक?
अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन आले आहे. हे विमान पंजाबमधील अमृतसर येथील गुरुराम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे. अमेरिकन लष्करी विमान एस-17 मध्ये 13 मुलांसह 104 बेकायदेशीर स्थलांतरित होते. यामध्ये 79 पुरुष आणि 25 महिला आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात पंजाबचे 30, हरियाणाचे 33, गुजरातचे 33, महाराष्ट्राचे 3, उत्तर प्रदेशचे 3 आणि चंदीगडचे 2 नागरिक आहेत.









