करवीर तहसिलदार, पोलीस बंदोबस्तात रविवारी सकाळी घेतला ताबा; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागेची तत्काळ स्वच्छता सुरु
कोल्हापूर प्रतिनिधी
भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाचा पहिला मजला रविवारी (दि.24) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ताब्यात घेतला. देवस्थान समितीचे सचिव तथा प्रांत अधिकारी राधानगरी सुशांत बनसोडे, करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे, मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत अन् पोलीस बंदोबस्तात देवस्थानने जागेचा ताब घेतला. यानंतर तत्काळ जागेच्या स्वच्छतेचे काम सुरु करण्यात आले.
नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रतिदिन सुमारे एक ते दीड लाख भाविक अंबाबाई मंदिरात येत असातात. भाविकांच्या सेवा-सुविधांसाठी येथे मंडप उभारण्यात येतो. भाविकांचा ओघ वाढत असल्याने मंदिर परिसरात गर्दी असते. यापार्श्वभूमीवर भाविकांना एकाच छताखाली दर्शन मंडप, हिरकणी कक्ष, औषधोपचार कक्ष, स्वच्छतागृह अशा विविध सुविधा पुरविण्यासाठी आणि एखादी आपत्ती उद्भवल्यास मंदिर परिसर मोकळा असावा, या उद्देशाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शनिवार 23 रोजी शेतकरी संघ प्रशासनाला संघाच्या इमारतीमधील पहिला मजला देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला होता. तसेच ताबा देण्यास टाळाटाळ अथवा विरोध केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला होता.
त्यानुसार रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास देवस्थान समितीचे सचिव तथा राधानगरीचे प्रांत अधिकारी सुशांत बनसोडे, करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे, मंडल अधिकारी संतोष पाटील हे पोलीस बंदोबस्तासह शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये आले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील अठरा हजार चौरस फुट जागेतील हॉलचे कुलुप काढून जागेचा ताब घेतला. यानंतर प्रशासनाकडुन तत्काळ जागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.
शेतकरी संघाचे माजी संचालक, सभासदांची आज बैठक
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शेतकरी संघाचा पहिला मजला देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याबाबत दिलेल्या आदेशासंदर्भात शेतकरी संघाचे माजी संचालक, सभासद, कर्मचारी संघटना यांची संघाचे अशाकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी बैठक आयोजित केली आहे. आज सोमवार 25 रोजी दुपारी 12 भवानी मंडप येथील संघाच्या इमारतीमध्ये बैठकीला सुरुवात होईल. बैठकीमध्ये जागेसंदर्भात जो काही निर्णय होईल त्यानुसार संघाची पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाईल, असे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी सांगितले.









