जागतिक वातावरणाचा परिणाम ः सेन्सेक्स 617 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजाराने घसरण नोंदविली आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिला असून युपेन, रशिया यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम बाजारावर सोमवारी दिसला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 617 अंकांच्या घसरणीसह 56,5,79.89 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 218 अंकांच्या घसरणीसह 16,953.95 अंकांवर बंद झाला. आज दिवसभरामध्ये आयटी, धातू, मिडिया, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी मोठय़ा प्रमाणात घसरण नोंदविल्याचे दिसून आले. दुसरीकडे इंडोनेशियाने पामतेलाच्या भारतात निर्यातीवर बंदी घातल्याने याचाही कांहीसा परिणाम भारतीय शेअरबाजारावर दिसून आला. भारतामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होणार अशी भीती सर्वसामान्यांमध्ये पसरली असून तिचे पडसाद शेअरबाजारावर दिसले.
सोमवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह खुले झाले होते. 439 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 56,757.64 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 165 अंकांच्या घसरणीसह 17005.05 अंकांवर खुला झाला होता. सेन्सेक्समध्ये एनटीपीसी आणि आयसीआयसीआय बँक व्यतिरिक्त इतर 28 समभाग नुकसानीत होते. तिकडे फ्युचर रिटेल सोबतचा करार रद्द झाल्याच्या निमित्ताने रिलायन्सच्या समभागावर त्याचा परिणाम दिसून आला. महिन्याचा शेवटचा आठवडा असल्यानेही शेअरबाजारात कांहीसा नकारात्मक कल दिसून आला. सोमवारी अदानी पॉवर, एबी कॅपिटल, बायोकॉन, टीव्हीएस मोटर्स यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे ओबेरॉय रियल्टी, झील, अपोलो हॉस्पिटल, जेएसडब्ल्यू एनर्जी, टाटा कम्युनिकेशन आणि जिंदाल स्टील यांचे समभाग घसरणीत राहिले होते.









