इस्रोकडून पोलारीमीटर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण : पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
नववर्षाच्या प्रथमदिनी भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाशाला गवसणी घातली आहे. या संस्थेने कृष्णविवरे आणि अवकाशातील अन्य वस्तूमानांचा शोध घेण्यासाठी प्रथम पोलारीमीटर उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. त्यानंतर काही वेळातच पीएसएलव्ही अग्निबाणाच्या चौथ्या टप्प्याचे यशस्वी परीक्षणही करण्यात आले आहे. या दुहेरी यशामुळे या संस्थेच्या माध्यमातून भारताने आपले अवकाशातील वर्चस्व सिद्ध करण्यात यश मिळविले आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून सोमवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी एक्स्पोसॅट हा भारत निर्मित उपग्रह पीएसएलव्हीच्या अग्निबाणाच्या आधारे अवकाशात झेपावला. प्रक्षेपणानंतर 21 मिनिटांच्या पूर्वनिर्धारित कालावधीत तो त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहचला. त्याच्या कार्याचा आता प्रारंभ झाला आहे. हा उपग्रह अवकाशातील कृष्णविवरे, त्यांचा अवकाशस्थ हालचालींवर होणारा परिणाम आणि आकाशगंगा आणि तारामंडळे यांचा अभ्यास करणार आहे.
पाठोपाठ दुसरे यश
या यशानंतर बेंगळूर येथील इस्रोच्या संशोधन केंद्रात पीएसएलव्ही अग्निबाणाच्या चौथ्या टप्प्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे परीक्षण दोनदा करण्यात आले. दोन्हीवेळा ते यशस्वी झाले. यामुळे उपग्रहांची कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 650 किलोमीटर अंतरावरुन 350 किलोमीटर अंतरावर आणणे शक्य झाले आहे. या अग्निबाणाच्या साहाय्याने इस्रोच्या इतर केंद्रांनी निर्माण केलेले 10 छोटे उपग्रह निम्नस्तरीय कक्षेत कार्यरत होणार आहेत. एप्रिल 2023 मध्ये संस्थेने पीएसएलव्ही सी-55 संबंधीचे प्रयोगही पीओईएम-2 चा उपयोग करुन यशस्वी केले होते. नवे प्रयोग हे याच प्रयोगांचा पुढचा टप्पा आहे.
एक्स्पोसॅटची वैशिष्ट्यो
एक्स्पोसॅट या उपग्रहामध्ये अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यांच्या साहाय्याने भारत अवकाशातील कृष्णविवरांवर लक्ष केंद्रीत करु शकणार आहे. तसेच इतरही महत्त्वाच्या अवकाशस्थ हालचालींचा अभ्यास केला जाऊ शकणार आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताला असे प्रयोग यशस्वी करणाऱ्या तीन देशांच्या पंक्तीत स्थान मिळाले असून ‘गगनयान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सज्जतेची पार्श्वभूमी यामुळे निर्माण झाल्याचे तज्ञांचे मत आहे.
निम्नकक्षा प्रक्षेपणाचे प्रयोग
नेहमीपेक्षा खालच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने यावेळी 260 टन वजनाचा पीएसएलव्ही-डीएल हा अग्निबाण उपयोगात आणला आहे. चौथ्या टप्प्यातील प्रयोग या प्रक्षेपणामुळे यशस्वी झाला. या प्रयोगासाठी त्रिमितीय स्थिर कक्षा प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात आला. संस्थेकडून ही माहिती देण्यात आली.
‘नववर्षाचा प्रारंभ आनंददायी’
भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या या यशामुळे नववर्षाचा प्रारंभ अत्यंत आनंददायी झाला आहे. या यशासाठी मी संस्थेच्या सर्व संशोधकांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतर अनेक मान्यवरांनी संस्थेची प्रशंसा केली.
अवकाश क्षेत्रात आणखी प्रगती
भारताचे हे यश महत्त्वपूर्ण असून त्यामुळे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताची आणखी प्रगती होणार आहे. अवकाशात प्रयोगशाळा सोडण्याची भारताची महत्त्वाकांक्षा असून त्या दिशेने भारत आणखी काही अंतर पुढे सरकला आहे. चंद्रावर मानव पाठविण्याचेही भारताचे ध्येय असून हेच सातत्य राहिल्यास भारत हे ध्येय पूर्ण करु शकेल, अशी प्रतिक्रिया विदेशांमधील काही तज्ञांनी व्यक्त केली.
एक्स्पोसॅट आणि अग्निबाणाचा चौथा टप्पा
ड एक्स्पोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे निम्नकक्षा प्रक्षेपणात क्षमता सिद्ध
ड पीएसएलव्ही अग्निबाणाची पुढची आवृत्ती स्वबळावर निर्मिण्यात यश
ड संस्थेच्या महत्त्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमासाठी पार्श्वभूमीची सज्जता









